मोहनीराज लहाडे
‘बीएसएनएल’मधील बदल: ५४४ पैकी ३७१ ‘व्हीआरएस’मध्ये
केंद्र सरकारच्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीत सुधारणा घडवण्यासाठी सुरु केलेल्या कार्यक्रमानुसार नगर जिल्ह्य़ापुढे आगामी काळात सुमारे ४० कोटी रुपयांचा वार्षिक तोटा भरून काढण्याचे, मार्चपर्यंत ‘फोर जी’ सुविधा सुरू करण्याचे, घरोघर फायबर केबल (एफटीटीएच) पोहचवण्याचे व ग्राहक सेवा सुरळीत ठेवण्याचे आव्हान उभे राहिले आहे आणि हे सर्व करताना ‘बीएसएनएल’ला अपुऱ्या मनुष्यबळाचाही सामना करावा लागणार आहे. सरकारच्या सूचनेनुसार कंपनीने लागू केलेल्या स्वेच्छा निवृत्ती योजनेला (व्हीआरएस) जिल्ह्य़ातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने ५४४ पैकी अवघे १७३ संख्याबळ कार्यरत राहणार आहे. त्यातीलही किमान २५ जण नजीकच्या काळात निवृत्त होत आहेत.
या बदलाला आम्ही सामोरे जात आहोत, ग्राहक सेवेवर त्याचा कोणताही परिणाम होऊ देणार नाही, कंत्राटी किंवा पुरवठादारांकडून सेवा उपलब्ध करून घेऊन ग्राहक सेवा निश्चितच अधिक सक्षमतेने दिली जाईल, ‘फोर जी’ व ‘एफटीटीएच’चे उद्दिष्टही निर्धारित वेळेत पूर्ण केले जाईल, बीएसएनएलचा तोटा, खर्च कमी करण्यावर भर दिला जात आहे, त्यासाठी व्हीआरएसद्वारे वेतनावरील खर्च कमी होण्याबरोबरच काही मोबाइल टॉवर भाडय़ाने देणे, नगर, श्रीरामपूरसह काही ठिकाणच्या इमारती भाडेतत्त्वावर देणे यांसारख्या उपाययोजना राबवल्या जाण्याची शक्यता असल्याची माहिती प्रधान महाप्रबंधक अजातशत्रू सोमानी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. इमारती केवळ भाडय़ाने दिल्या जाणार आहेत, त्याही केवळ सरकारी कार्यालयांना, कोणत्याही मोकळ्या जागा विकल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बदलांना बीएसएनएलमधील अधिकारी व कर्मचारी संघटनांनी सुरुवातीला विरोध केला, मात्र कंपनीतील या सुधारणांची सरकारने अंमलबजावणी सुरू केली आहे. पन्नास वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी ‘व्हीआरएस’ योजना लागू करण्यात आली. अंतिम मुदत दिलेल्या ३ डिसेंबरपर्यंत ३७१ जणांनी ही योजना स्वीकारली. आता केवळ ४९ अधिकारी व १०३ कर्मचारी राहिले आहेत. त्यांना जिल्ह्य़ाचा भार पेलावा लागणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात बदल्याही अपेक्षित आहेत. सध्या बीएसएनएलकडे जिल्ह्य़ात ४५७ मोबाइल टॉवर आहेत, त्यातील ७३ भाडेतत्त्वावर इतर कंपन्यांना दिले आहेत. त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मोबाइल ग्राहकांची संख्या सुमारे ३ लाख ५० हजार, लँडलाइन ग्राहक संख्या, ४४ हजार ६५, ब्रॉडबँड ग्राहक संख्या १५ हजार ९९४ तर एफटीटीएच ग्राहक संख्या २ हजार २४१ आहे.
इतर कंपन्यांनी दरवाढ केल्याने मोबाइल ग्राहक बीएसएनएलकडे वळाला असल्याचा दावा करून श्री. प्रधान महाप्रबंधक सोमानी यांनी सांगितले की, एफटीटीएचमुळे इंटरनेट सेवेची गती अधिक सुधारणार आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने बीएसएनएल स्पर्धेत तर आहेच परंतु आगामी काळात आम्हाला अधिक सक्षमतेने ग्राहक सेवा पुरवण्याकडे लक्ष द्यायचे आहे. त्यासाठी काही सुधारित आदेशांची प्रतीक्षा आहे. १ फेब्रुवारीपासुन नवीन सुधारणा अमलात येतील.
खापर कर्मचाऱ्यांच्या माथी
बीएसएनएलच्या तोटय़ाची कारणे सरकार, कंपनीच्या चुकीच्या धोरणात आहेत, त्याचे खापर कर्मचाऱ्यांच्या माथी मारले जात आहे. आता शिल्लक राहिलेल्या कर्मचाऱ्यांनी रोजीरोटीसाठी मनाची तयारी करून सामोरे जाण्याचे ठरवले आहे. बीएसएनएलने इतर कंपन्यांसारखी दरवाढ केली व सरकारनेही इतर खासगी कंपन्यांसारखा बीएसएलएनला न्याय दिला तर अडचणी येणार नाहीत. ग्राहकांचा अद्यापि बीएसएनएलवर विश्वास आहे.
– अप्पासाहेब गागरे, राज्य अध्यक्ष, बीएसएनएल ई. यु.
फोर जी सुविधा लवकर हवी
आता अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या इतकी कमी झाली आहे की एखाद्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आम्हाला आंदोलनही करता येणार नाही. फोर जी सुविधा लवकर उपलब्ध झाली, तर ती उपयोगाची ठरेल, काही ठरावीक उद्योगपतींकडून होणारे ग्राहकांचे शोषण थांबवण्यासाठी बीएसएनएल बाजारात तग धरून राहणे आवश्यक आहे. कंपनीने व्हीआरएस लागू करताना जे कबूल केले ते वेळेत द्यावे.
– अशोक हिंगे,
जिल्हा सचिव एनएफटीई बदलांबाबत सकारात्मक
सध्या सुरू असणाऱ्या सुधारणांचे चित्र स्पष्ट होण्यास अद्याप अवधी आहे, जानेवारीनंतर परिणाम दिसू लागतील, काही निर्णयांची अद्याप प्रतीक्षा आहे. मनुष्यबळ एकदमच कमी होणार असल्याने सुरुवातीचे काही दिवस त्याचे परिणाम दिसतील. आम्ही त्याचा परिणाम ग्राहक सेवेवर होऊ देणार नाही. परंतु अनुभवी मनुष्यबळ ही कंपनीची संपत्ती होती. बदलांबाबत आम्ही सकारात्मक आहोत.
– विजय पिंपरकर, माजी जिल्हा सचिव, बीएसएनएल ई. ए.