दापोली नगर पंचायत निवडणूक यंदा प्रथमच १७ प्रभागांत होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी नव्याने डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे येथील प्रभागनिहाय मतदारसंख्या मर्यादित राहणार असून मतदारांना ‘प्रभावी’ आमिषे दाखवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सध्या प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याने संभाव्य उमेदवारांचे त्याकडेच डोळे लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दापोली नगर पंचायत निवडणूक यापूर्वी सहा प्रभागांत होत असे. यामुळे एका प्रभागातून अनेकांना निवडून देण्याची संधी मतदारांना मिळत होती. यामध्ये युती-आघाडय़ांपेक्षा व्होट बँकांच्या ‘क्रॉस व्होटिंग’कडे उमेदवारांना लक्ष द्यावे लागत असे; पण यंदा प्रत्येक प्रभागात एकच नगरसेवक निवडला जाणार असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाला वेगवेगळी रणनीती आखावी लागणार आहे. राजकीय डावपेच आखण्यात शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी यापूर्वीच आघाडी घेतली असून जावेद मणियार यांना नगराध्यक्षपदी बसवून त्यांनी पक्षाची अल्पसंख्याक व्होट बँक अधिकच मजबूत केली आहे. केंद्र आणि राज्यातील सत्तेत भाजपसोबत बसलेल्या शिवसेनेला आता ही व्होट बँक दापोली नगर पंचायत निवडणुकीत कशी प्रतिसाद देणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे.

दापोलीत अनेक प्रभागांत अल्पसंख्याक व्होट बँक निर्णायक ठरणार असून राष्ट्रवादी व काँग्रेसलाही त्या दृष्टीने डावपेच आखावे लागणार आहेत. मंडणगडमध्ये यशस्वी झालेल्या महाआघाडी पॅटर्नची दापोलीत पुनरावृत्ती करण्याकडे आमदार संजय कदम यांचे प्रयत्न आहेत. त्याबरोबरच उमेदवारीवरून पक्षांतर्गत नाराजी निर्माण होणार नाही, याला पक्षाकडून सर्वोच्च प्राधान्य मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या नगर पंचायतीमध्ये त्यांचे सर्वाधिक म्हणजेच सहा नगरसेवक आहेत.

दापोलीत भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असला तरी त्यांना या निवडणुकीत ‘मोदी इफेक्ट’चा फारसा फायदा होणार नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळे वलय असलेल्या नेत्यांवर पक्षाला अधिक अवलंबून राहावे लागणार आहे. या अनुषंगाने भाजप नेते केदार साठे उमेदवार निवडप्रक्रियेत कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

गेल्या वेळी ‘क्रॉस व्होटिंग’चा सर्वाधिक फायदा घेणाऱ्या मनसेला यंदाच्या निवडणुकीत सर्वात जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच मनसेचे जिल्हाध्यक्ष झालेले संतोष शिर्के यांनी प्रथम शिवसेना आणि आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षाकडे डावपेच आखणारी ‘थिंक टँक’ आता कमी झाली आहे. या पाश्र्वभूमीवर नगरसेवक नितीन शिदे आणि सचिन गायकवाड काय रणनीती आखणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, दापोली नगर पंचायतीत जवळपास अकरा हजार मतदार असून दर वेळी ६० टक्क्यांच्या आसपास मतदान होते. त्यामुळे प्रत्येक प्रभागात चारशेच्या आसपास मतदान झाल्यास दोनशे मतांचा टप्पा विजयाला गवसणी घालणारा ठरू शकेल.  त्यातच शिवसेना, महाआघाडी, भाजप आणि मनसे अशी चौरंगी लढत झाल्यास विजयासाठीची मतसंख्या सव्वाशेच्या घरात येण्याची शक्यता आहे. सध्या प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असून ती जाहीर झाल्यानंतरच डावपेचांना वेग येईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in dapoli political tactics