वैद्यकीय सेवा सुविधा देताना आपल्याला कौशल्यपूर्ण काम करावे लागणार आहे. त्याच वेळी वैद्यकीय क्षेत्रातील आव्हानांचाही सामना करावा लागणार असल्याने अभ्यासक्रमात गुणवत्तापूर्ण बदल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.
येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित १२ व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री डी. पी. सावंत, पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अमित बॅनर्जी, राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजा पनवार, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, प्रतिकुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर, कुलसचिव डॉ. आदिनाथ सूर्यकर आदी उपस्थित होते.
पदवी किंवा अनुभवातून कमावलेले ज्ञान ही बदलाची नांदी असते. याचा वापर समाजात काही सकारात्मक बदल घडण्यासाठी करावा, असा सल्लाही डॉ. गावित यांनी दिला. डॉ. पनवार यांनी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी काम करणाऱ्या डॉक्टरांच्या कामाचा सन्मान करण्याची सूचना केली. राज्यमंत्री सावंत यांनी वैद्यकीय प्रगतीच्या कितीही गप्पा मारल्या तरी एड्स आणि कॅन्सरसारख्या आजारावर आपण अद्याप मात करू शकलो नसल्याचे वास्तवही त्यांनी मांडले. राज्य सरकारच्या योजनेंतर्गत नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. जामकर यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत प्राथमिक स्वरूपात औषधोपचार देता यावे यासाठी स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. याशिवाय विद्यापीठ स्तरावर सध्या ग्रामीण भागातील कुटुंब दत्तक घेण्याचा उपक्रम नाशिक जिल्हय़ात राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमात विविध विद्याशाखांच्या ६० विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. २०११ व २०१२ या वर्षांतील विविध अभ्यासक्रमांमध्ये उत्तीर्ण झालेल्या एकूण सहा हजार ६०० विद्यार्थ्यांना पदव्या दिल्या गेल्या. या वेळी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून कार्यक्रमात सहभाग घेतला.

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची मनमानी रोखणार
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या मनमानीवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी दिली. या कायद्यामुळे परीक्षा नियंत्रण समिती, परीक्षा शुल्क समिती यांसारख्या समित्या नामशेष होणार असून सर्व कारभार शासकीय पद्धतीने चालेल, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी संकेतस्थळावर संबंधित महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व केंद्र सरकारची मान्यता आहे की नाही ते पाहावे, असा सल्लाही डॉ. गावित यांनी दिला. आंतरविद्या अभ्यासक्रमासंदर्भात सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आणि अ‍ॅलोपॅथी यांपैकी कुठल्याही शाखेचा पदवीधर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याला आवडणाऱ्या शाखेची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या शाखेच्या सरावासाठी पात्र होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये विद्यापीठाच्या सहकार्याने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी महापालिकेशी चर्चा सुरू असून लवकरच याबाबत प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात होईल, अशी माहिती डॉ. गावित यांनी दिली. नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता देण्यात आली असली तरी तेथे आवश्यक तेवढी जागा उपलब्ध झालेली नाही. पुढील टप्प्यात नंदुरबारसह बारामती, अलिबाग, सातारा, गोंदिया, चंद्रपूर येथील महाविद्यालयांच्या कामकाजास चालना देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.