मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा संघटनांनी यवतमाळमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला विरोध केला होता. कुठं या कार्यक्रमाच्या पोस्टरला काळे फासण्यात आले, तर कुठं ही पोस्टर्स फाडण्यात आली. अशातच आता मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रम चालू असताना मराठा संघटनांनी गोंधळ घातला.
मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम चालू असतानाच काळे झेंडे दाखवत ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. आंदोलकांमध्ये पुरुषांबरोबरच महिलांचाही समावेश होता. या गोंधळात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता. त्यांनी ‘उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशी घोषणाबाजी केली.
“शासन आपल्या दारी हा बोगस कार्यक्रम”
पोलीस ताब्यात घेत असताना एक आंदोलक माध्यमांशी बोलताना म्हणाले, “शासन आपल्या दारी हा बोगस कार्यक्रम आहे. त्यांनी शेतकऱ्याला वीज दिलेली नाही आणि शासन आपल्या दारी म्हणत आहेत. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. निराधांना पैसे मिळेना आणि हे शासन आपल्या दारी म्हणत आहेत. त्यामुळे शासन आपल्या दारी हा बोगस कार्यक्रम आहे.”
हेही वाचा : मनोज जरांगेंवर तातडीने काय उपचार व्हायला हवेत? आंदोलक आरोग्यसेविका भावनिक होत म्हणाल्या…
“शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही अन् शासन आपल्या दारी”
“शेतकऱ्याला न्याय नाही, शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही, शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही आणि शासन आपल्या दारी आणत आहेत,” असं म्हणत आंदोलकांनी सरकारविरोधातील आपला रोष व्यक्त केला.