विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आज चप्पल फेकण्यात आली. इंदापूर येथे ही घटना घडली. यावरून छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत मराठा आरक्षणाचाही उल्लेख केला. तसंच, जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंदापूर येथे आज (९ डिसेंबर) ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ उपस्थित होते. या मेळाव्यातून पडळकर आणि भुजबळांनी रोखठोक भाषण केलं. या दोघानींही मनोज जरांगे पाटलांना घेरलं. तसंच, मराठा आंदोलनावरही टीका केली. दरम्यान, गोपीचंद पडळकर शेजारी सुरू असलेल्या आंदोलन स्थळाला भेट देण्याकरता गेले होते. तिथं शेजारीच मराठा समाजाकडून आरक्षण मागणीसाठीचे साखळी उपोषण सुरू होते. यावेळी मराठा समाजाकडून पडळकरांवर चप्पल फेकण्यात आली असल्याचा दावा केला जातोय.

हेही वाचा >> “तेली, कोळी, साळी, माळी समाजातील पोरांना…”, मराठ्यांना कुणबी दाखले देण्यावरून गोपीचंद पडळकरांचा घणाघात

याप्रकरणी छगन भुजबळांनी एक्सवर पोस्ट केली. ते म्हणाले, आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, विरोध आहे तो झुंडशाहीला व दादागिरीला! ते पुढे म्हणाले, आज विधानपरिषद सदस्य गोपीचंदजी पडळकर यांच्यावर काही समाजकंटक लोकांनी विकृती दाखवून व लोकशाही पायदळी तुडवून हल्ला केल्याची बातमी समजली! या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र निषेध करतो! मी आजही इंदापूर येथे जाहीर सभेत सांगितल आहे की ही दादागिरी थांबली नाही तर याला आम्ही जशास तसे उत्तर देऊ!

दरम्यान, गोपीचंद पडळकरांनी आज मराठा समाजाला देत असलेल्या कुणबी दाखल्यावर आक्षेप घेतला. इंदापूर येथे झालेल्या सभेत ते म्हणाले, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना सरसकट कुणबी दाखले देण्यात आले. परंतु, आमच्या समाजातील काही लोकांना दाखले मिळण्याकरता चार चार महिने वाट पाहावी लागते, त्यांच्याकडून पुरावे मागितले जातात.

तर, दुसरीकडे छगन भुजबळांनीही जहाल भाषण केलं. मनोज जरांगे पाटलांची नक्कल करत त्यांच्या भूमिकेवर टीका केली. तसंच, जरांगे पाटलांना ग्रामपंचायतीचा सरपंच हेण्याचे आव्हानही केले. भुजबळांच्या या टीकवर मनोज जरांगे पाटलांनीही चोख प्रत्युत्तर दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chappal throw at gopichand padalkar in indapur chhagan bhujbal reacts on maratha reservation protesters sgk