सोलापूर : अकलूजमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या बंगल्यात चोरीच्या हेतूने शिरल्याच्या संशयावरून बेदम मारहाण झालेल्या एका तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह आठजणांविरूध्द अकलूज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी दोघांना अटक झाली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह इतरांचा पोलीस शोध घेत आहेत.
मृत तरूण मागासवर्गीय असल्यामुळे या गुन्ह्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची (ॲट्राॕसिटी ॲक्ट) कलमांची वाढ होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.
हेही वाचा >>> राष्ट्रवादीची भाजपशी वैचारिक नव्हे राजकीय युती – नायकवडी
अभिजीत उत्तम केंगार (वय २१, रा. वाघोली, ता. माळशिरस) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी स्वतः सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार धवलसिंह मोहिते-पाटील (वय ४५) यांच्यासह गिरझणी गावचे माजी सरपंच सतीश संभाजी पालकर (वय ५२) व माजी सदस्य मयूर नवनाथ माने (वय ३३), हिरा रामचंद्र खंडागळे (वय ३०, रा.महर्षी काॕलनी, अकलूज) आणि इतर अनोळखी चार साथीदारांविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (भारतीय दंड संहिता कलम ३०४,३२४, ३४) दाखल झाला आहे. यातील सतीश पालकर व मयुर माने यांना अटक झाली असता त्यांना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा >>> मराठा सर्वेक्षणात सरकारचा नाकर्तेपणा – जयंत पाटील
मृत अभिजीत केंगार हा गेल्या १८ जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर उशिरा भटकत धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रतापगड बंगल्यात शिरला. तो चोरी करण्याच्या हेतूने बंगल्यात शिरल्याच्या संशयावरून त्याला पकडून जाड कारल (मुदगल), काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्यात बेशुध्द पडल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्यास उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरू केला असता गुन्हा निष्पन्न झाल्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी सांगितले. पुढील तपास अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे-पाटील करीत आहेत. धवलसिंह मोहिते-पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आहेत.