आर्णी न्यायालयाच्या आदेशानुसार निम्न पनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सुधाकर बोरसे, उपअभियंता राजपाल वाणे, बी.टी.कदेवाडे, व शेतकरी दत्तात्रय लिगांवार अशा चार व्यक्तींविरुध्द आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.  
याबाबत अधिकृत वृत्त असे की, महाराष्ट्रातील मोठा सिंचन प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निम्न पनगंगा प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहण प्रकरणात गरव्यवहार झाल्याने निम्न पनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीचे कार्यकत्रे विजय राऊत यांनी भूसंपादनाअंतर्गत शेतीच्या खरेदीत २० लाख ५५ हजार रुपयाने शासनाची फसवणूक झाल्याची तक्रार आर्णी पोलीस ठाण्यात केली होती. मात्र, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने धरणविरोधी संघर्ष समितीने थेट न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार आर्णी न्यायालयाने बुधवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपपोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी कार्यकारी अभियंता बोरसे यांच्यासह चौघांविरुध्द गुन्हा नोंदवला आहे. विषेश म्हणजे, निम्न पनगंगा प्रकल्प अनेक वर्षांंपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असून धरणविरोधी संघर्ष समितीने मात्र या प्रकल्पाच्या कामात बदल व्हावा, अशी मागणी पुढे रेटून लढा सुरू ठेवला आहे. या अगोदर सुध्दा काही अधिकाऱ्यांवर याच संदर्भात गुन्ह्य़ांची नोंद झालेली आहे. त्यामुळे या वादग्रस्त प्रकल्पासंदर्भात चच्रेला पेव फुटले आहे. संबंधित अधिकारी व यंत्रणेविरुध्द गुन्हा दाखल झाल्याने धरणविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील जगताप, मुबारक तव्वर, प्रल्हाद गावंडे, अ‍ॅड.बालाजी येरावार, मिलिंद पाटील यांनी समाधान व्यक्त करून लढा पुढेही असाच सुरू राहील, असे स्पष्टपणे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charges against nimn panganaga project officer