प्रक्षोभक भाषणाबद्दल राज्य पोलिसांची कारवाई
दोन समाजांत धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्याविरुद्ध गुरुवारी सायंकाळी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी दिली.
तोगडिया यांनी विशिष्ट समाजघटकांविरोधात भावना भडकावणारी भाषणे केल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली होती. त्यांच्याविरोधात या चौकशीआधारे कारवाई करण्याची सूचना केंद्रीय गृहखात्याने केली होती. त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन राज्य सरकारने केंद्राला दिले होते.
तोगडिया गेल्या २२ जानेवारीला नांदेड दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यातील त्यांची एकमेव जाहीर सभा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर या मतदारसंघात झाली. त्यांच्या या दौऱ्यातील सर्व भाषणांचे संकलन पोलिसांनी केले होते. गेल्या काही दिवसांत मजलिस इत्तेहादूल मुसलमीनचे नेते ओवेसी बंधू विरुद्ध तोगडिया यांच्यात शाब्दिक संघर्ष चालला होता. भोकर येथे २२ जानेवारी रोजी झालेल्या जाहीर सभेत तोगडिया यांनी आमदार अकबरुद्दीन ओवेसी आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल काढलेले उद्गार प्रसिद्ध झाल्यानंतर याबाबतचा वाद चिघळला आहे. आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात कारवाई होत असताना तोगडियांना अभय कशासाठी, असा आक्षेप घेण्यात आला होता. गेल्या महिन्यात आंध्र प्रदेशमधील अदिलाबाद जिल्ह्य़ात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ओवेसी यांनाही तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. राज्य सरकारच्या आदेशानुसार तब्बल दोन आठवडय़ांनंतर तोगडियांवर गुन्हा दाखल झाला.
भोकरचे पोलीस निरीक्षक पंडित मुंडे यांनी गुन्हा दाखल करताना तोगडियांवर फौजदारी कायद्याची २९५ (अ), १५३ (अ) आणि ५०५ (२) आदी कलमे लावण्यात आली आहेत.