पवन उर्जा प्रकल्पात ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या ‘ आवादा’ कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागणारा वाल्मिक कराड यांचा आवाज आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांचे आवाजाचे एकमेकांशी जुळणारे नमूने, हत्या प्रकरणातील आरोपींचा खंडणीशी गुन्ह्याशी असणारा सहसंबध दाखविणारे सीसीटिव्ही चित्रणे या ऐवजासह राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोप पत्र दाखल केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे १८० साक्षीदार, पंच यांच्या मदतीने तपासानंतर केल्यानंतर दाखल गुन्ह्यातील आरोपींचा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याने त्यास पहिल्या क्रमांकाचा आरोपी बनविण्यात आले आहे. तपास अधिकारी बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तपासातील ‘ डिजिटल’ स्वरुपाचे पुरावे न्यायवैधक प्रयोगशाळेकडून तपासून दोषारोप तयार करण्यात आले आहे.
दोषारोप पत्रातील क्रमांक दोनचा आरोपी विष्णू चाटे याच्या दूरध्वनीवरुन २९ नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराड याने खंडणी मागताना , ‘ अरे ते काम बंद करा, ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले त्या परिस्थिती ते बंद करा. अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील. काम चालू केले तर याद राखा’ असे धमकावले होते. पुढे याच प्रकरणात दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. या सर्व आरोपींचे आवाजाचे नमुने व त्याचे मेमरी कार्ड पुरावे म्हणून दोषारोप पत्रात नोंदवले आहेत. मात्र आरोपी विष्णू चाटे याचा भ्रमणध्वनी नष्ट झाला असल्याचे दोषारोप पत्रात मान्य करण्यात आले आहे. मात्र, हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी क्रमांक सहा संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना हसत आनंद साजरा करत असल्याचे छायाचित्रणही न्यायालयात सादर करण्यात आले आहे.
वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर त्याचा फिकट निळ्या रंगाचा आयफोन, सोनेरी रंगाचे अन्य दोन भ्रमणध्वनी संचही ताब्यात घेतले असून आरोपींशी झालेल्या संभाषणाच्या आधारे दोषाराेप पत्र दाखल करण्यात आले आहे. संतोष देशमुखा यांची हत्या ज्या लोखंडी लोखंडी पाईप, त्याला करदोड्याने बांधून बनवलेली मूठ, आरोपीच्या काळ्या रंगाच्या गाडीत तसेच पाईपला लागलेले रक्ताचे डाग यांचे उल्लेखही दोषारोपामध्ये करण्यात आले आहेत. आरोपींचे मोबाईल, त्यांच्या गाडीत सापडलेले टी शर्ट, गॉगल, एटीएम कार्ड, प्रादेशिक परिवहन विभागाने गाड्यांसाठी दिलेले प्लास्टिकचे कार्ड अशा अनेक वस्तू तपासकामी ताब्यात घेतल्याचा दोषारोप पत्रात उल्लेख आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात आडवे आले म्हणून संपवा अन्यथा आपण भिकेला लागू, असे म्हणत वाल्मिकच या गुन्ह्यातील सूत्रधार असल्याचे दोषारोपात म्हटले आहे. या आरोपींमधील सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार संघटित गुन्हेगारी करत होते. त्याने व त्याच्या साथीदाराने केज, अंबाजोगाई, धारुर व धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे १० वर्षात ११ गुन्हे केले असल्याचे दोषारोपात म्हटले आहे.
असा आहे खंडणीच्या गुन्ह्याचा दोषारोप पत्रातील तपशील
आठ ऑक्टोबर २०२४ रोजी अवादा एनर्जी प्रा. लि. चे जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे हे वाल्मीक कराड यांचे सांगणे वरुन वाल्मीक कराड याच्या परळी येथील ऑफीसमध्ये जाऊन भेटले. त्यावेळी विष्णु चाटे हा हजर होता. या वेळी वाल्मीक कराड याने, “कंपनी चालू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये दया नाहीतर बीड जिल्हयातील अवादा कंपनीची सर्व कामे बंद करा” अशी धमकी दिली. पुढे याच मागणीसाठी २९ नोव्हेंबर रोजी वाल्मिक अण्णाची डिमांड पूर्ण करा आणि भेट घ्या तोपर्यंत काम चालू करू नका अशी सुदर्शन घुले याने धमकी दिली.
या दिवशी कटाची चर्चा
२९ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी वाल्मीक कराड, विष्णु चाटे, सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे यांनी विष्णु चाटे याचे केज येथील कार्यालयात मिटींग घेवुन अवादा एनर्जी प्रा. लि. कंपनी ०२ कोटी रुपये खंडणी देत नाही. त्याकरीता काय करावे लागेल याची चर्चा केली. यावेळी प्रतिक घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे हे कटामध्ये सामील झाले.
सुरक्षा रक्षकास मारहाण
वारंवार खंडणी मागुनही अवादा एनर्जी प्रा.लि. कंपनीने वाल्मीक कराडला खंडणी न दिल्यामुळे, दिनांक ०६/१२/२०२४ रोजी सुदर्शन घुले, प्रतिक घुले व सुधीर सांगळे हे अवादा एनर्जी प्रा. लि. कंपनीमध्ये गेले व तेथील सुरक्षा रक्षकास मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली.
संतोष देशमुख यांना धमकी
अवादा एनर्जी प्रा.लि. चे जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे यांना दोन कोटी रुपये दया नाहीतर कंपनी बंद करा. अशी धमकी देवुन शिवीगाळ व धक्काबुक्की केली. अवादा एनर्जी प्रा. लि. कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी फोन करुन सरपंचला सदर घटनेबाबत सांगितले. त्यावरुन मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हे त्या ठिकाणी गेले व संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुले व त्यांचे साथीदारांना विनंती करुन, “कंपनी बंद करु नका. लोकांना रोजगार मिळु दया असे सांगितले. ” त्यावेळी सुदर्शन घुले याने सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणी मागण्यात अडथळा निर्माण करत असल्याने संतोष देशमुख यांना वारंवार सरपंच तुला बघून घेतो. जीवंत सोडणार नाही, अशी विष्णू चाटे धमकी देत होता.
आडवा येणाऱ्यास संपवा
दरम्यान ७ डिसेंबर रेाजी रोजी सुदर्शन घुले याने वाल्मीक कराड यास कॉल केला त्यावेळी वाल्मीक कराड याने सुदर्शन घुले यास सांगितले की, ” जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू असेच होत राहिले तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही. आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल. कामाला लागा अशा सूचना केल्या. पुढे संतोष देशमुख यांची अमानुषपणे मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आली.