बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, वाल्मीक कराडकडून अवादा कंपनीकडे मागण्यात आलेली २ कोटींची खंडणी, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मकोका) या तिन्ही प्रकरणातील सुमारे १४०० पानांचे दोषारोपपत्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून विशेष मकाेका न्यायालयात दाखल केले. या माहितीला एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. तर संताेष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही वरील माहिती माध्यमांसमाेर बाेलताना दिली.
उपरोक्त तिन्ही गुन्हे हे केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी विशेष तपास समिती (एसआयटी), राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास व न्यायालयीन समिती, अशा तीन यंत्रणा नियुक्ती करण्यात आल्या आहेत. तर २६ फेब्रुवारी रोजी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना नियुक्त केले आहे. ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याच सात जणांविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याचाही एक स्वतंत्र गुन्हा दाखल आहे. यातील सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे व सुधीर सांगळे यांना २ जानेवारीला फरार घोषित करण्यात आले. तर ५ जानेवारी रोजी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले व विष्णू चाटे यांना अटक करून १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
वाल्मीक कराड याच्यासह विष्णू चाटे व सुदर्शन घुले या तिघांविरुद्ध ११ डिसेंबर रोजी अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील केदू शिंदे यांच्या तक्रारीवरून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर रोजी वाल्मीक कराड पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात हजर झाला. त्याला १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर १४ जानेवारी रोजी वाल्मीक कराडवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वयेही गुन्हा दाखल झाला. कराडला १५ जानेवारी रोजी मकोकाच्या विशेष न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. २६ जानेवारी रोजी सुदर्शन घुलेला अटक करण्यात आली. त्याला ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यातील कृष्णा आंधळे हा आरोपी घटनेच्या ८० दिवसांनंतरही पोलीस, तपास यंत्रणांच्या हाती लागला नाही.