सातारा: दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या भारत पर्व प्रदर्शनात महाराष्ट्राच्या वतीने देशातील पहिले मधाचे गाव मांघर (ता. महाबळेश्वर) गावावर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे. ज्या राज्यांच्या चित्ररथांना कर्तव्यपथावरील संचलनात संधी मिळत नाही, अशांना लाल किल्ला परिसरात भरणाऱ्या या भारत पर्व प्रदर्शनात समाविष्ट केले जाते.
मांघर हे मधपालन करणाऱ्यांचे गाव आहे. या गावातील प्रत्येक घरात मधपाळ असून, साताऱ्यात एकूण मधाच्या उत्पादनापैकी दहा टक्के उत्पादन या एकट्या गावात होते. मधाचे गाव मांघर येथे प्रारंभी गावातील लोकांना प्रशिक्षण दिले गेले. यानंतर त्यांना मधपेट्या देण्यात आल्या. वन विभागाच्या साहाय्याने मधमाशीपूरक वनस्पतींची लागवड करण्यात आली. गावात मधमाशीचे मधुबन, माहिती दालन, प्रचार-प्रसिद्धी-विक्री केंद्र उभे राहिले आहे. गावात मध उत्पादन प्रशिक्षण केंद्र व माहिती दालनदेखील आहे.
मधाचे गाव निर्मितीसाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नाने तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मोठी भूमिका बजावली. तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, संचालक रघुनाथ नारायणकार यांनी यासाठी पुढाकार घेतला.
आदर्श गाव
महाबळेश्वर तालुक्यातील मांघर गावास देशातील पहिले मधाचे गाव होण्याचा सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्रात दर वर्षी सुमारे १.२५ लाख किलो मधाचे उत्पादन होते. त्यातील सुमारे ३५ हजार किलो मधाचे उत्पादन महाबळेश्वर व आसपासच्या भागात केले जाते. महाबळेश्वर तालुक्यात मांघर हे निसर्गाचे वरदान लाभलेले गाव आहे. हे आदर्श गाव आहे. ‘स्मार्ट व्हिलेज’ असलेल्या मांघरने निर्मलग्राम पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार, एक गाव एक गणपती पुरस्कार व लोकग्राम पुरस्कार असे अनेक पुरस्कार पटकाविले आहेत. १६ मे २०२२ रोजी मांघरला देशातील पहिले मधाचे गाव म्हणून मान मिळाला. मांघर गावात घरटी मधाचे उत्पादन घेतले जाते.
लाल किल्ल्यावर होणाऱ्या प्रजाकसत्ताक दिनाच्या भारत पर्व प्रदर्शनातील चित्ररथात मधाचे गाव ‘मांघर’ या मध उत्पादनाची संकल्पना असणाऱ्या गावाचा समावेश आहे. ही महाबळेश्वर तालुक्यातील मधउत्पादक शेतकऱ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. – संजय गायकवाड, अध्यक्ष, मधुसागर मधउत्पादक संस्था, महाबळेश्वर