– संदीप आचार्य, लोकसत्ता

राज्यातील धर्मादाय रुग्णालयात नियमानुसार गरीब व निर्धन रुग्णांसाठी २० टक्के खाटा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. तथापि याची नेमकी माहिती अनेकदा गरीब रुग्णांना मिळू शकत नाही. यावर उपाय म्हणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून ‘आरोग्य आधार’ ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपमुळे एका क्लिकवर राज्याच्या कोणत्याही भागातील रुग्णांना राज्यातील कोणत्या धर्मादाय रुग्णालयात त्यांच्यासाठी राखीव खाटा उपलब्ध आहेत, याची अचूक महिती मिळणार आहे. ‘आयसीआयसीआय बँके’च्या सहकार्याने हे ॲप तयार करण्यात आले असून लवकरच याचे लोकार्पण करण्यात येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात एकूण ४६८ धर्मादाय रुग्णालये असून मुंबईत ८३ धर्मादाय रुग्णालये आहेत. नियमानुसार या रुग्णालयांना दहा टक्के खाटा या निर्धन वर्गासाठी मोफत तर आर्थिक दुर्बल घटकासाठी ५० टक्के सवलतीच्या दरात खाटा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. धर्मादाय आयुक्तालयाच्या अखत्यारित या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे अपेक्षित आहे. तथापि या विभागाकडे असलेला कमी कर्मचारी वर्ग तसेच अन्य कारणांमुळे धर्मदाय रुग्णालयांमधील राखीव खाटा गरीब रुग्णांना खरोखरच मिळतात का? हे कळणे अशक्य होते. शिवाय आपत्कालीन परिस्थितीत गावखेड्यातून येणाऱ्या रुग्णाला मुंबई, पुण्यातील मोठ्या रुग्णालयांमधील खाटांची नेमकी माहिती मिळणे व उपचारासाठी दाखल करून घेणे कठीण होत असल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षमध्ये एक डॅश बोर्ड तयार करून घेतला होता. या डॅशबोर्डवर धर्मादाय रुग्णालयातील उपलब्ध खाटांची नेमकी माहिती मिळायची. तथापि राज्यातील सत्ताबदलानंतर तसेच करोना काळात ही व्यवस्था मोडीत निघाली.

विधिमंडळात राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब व दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना उपचार मिळत नसल्याचे तसेच लोकप्रतिनिधींना याबाबत योग्य माहितीही दिली जात नसल्याचा मुद्दा काही आमदारांनी उपस्थित केला होता. यावेळी धर्मादाय रुग्णालयात नियमानुसार गरीब रुग्णांना मोफत उपचार वा सुविधा नाकारल्यास तो विधिमंडळाचा हक्कभंग समजून कठोर कारवाई केली जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले होते. तसेच रुग्णांना रुग्णालयातील मोफत उपचारासाठीच्या खाटांची माहिती व्हावी, यासाठी लवकरच ॲप सुरु करण्यास अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले होते. यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विषयावर दोन बैठका घेऊन धर्मादाय रुग्णालयांना गरीब रुग्णांवर मोफत उपचार करणे अनिवार्य ठरण्याच्या दृष्टीने संबंधितांशी बोलून योजनेची आखणी केली.यात आरोग्य विभागाचे सचिव, विधिव न्याय विभागाचे सचिव, आरोग्य विभागाचे अधिकारी, धर्मादाय आयुक्त

तसेच धर्मादाय रुग्णालयांच्या प्रतिनिधींसह संबंधिताची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत धर्मदाय रुग्णालयातील गरीब व दारिद्र्य रेषेखालील रुग्णांसाठीच्या बेडची माहिती ॲपवर उपलब्ध करून देणे, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर या योजनेविषयीची माहिती ठळकपणे प्रसिद्ध करणे, धर्मादाय रुग्णालयात आरोग्य विभागाच्या माध्यमातून गरीब रुग्णांना मोफत वा सवलतीच्या दरात उपचार मिळण्यासाठी आरोग्य सेवेकांची नियुक्ती करण्याचे निर्णय घेतले.

हेही वाचा : ‘आयुष्मान भारत’ व ‘महात्मा फुले जनारोग्य योजना’ विश्वस्त न्यासाच्या माध्यमातून राबवणार!

याशिवाय धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब व दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना नियमानुसार मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळण्यासंदर्भात एक टास्क फोर्सची नियुक्ती करणे व या रुग्णालयांची नियमित व अचानक तपासणी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे.

याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना विचारले असता ते म्हणाले, “धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांवर होणारे उपचार, त्यासाठीच्या खाटा तसेच अन्य बाबींची तपासणी करण्यासाठी धर्मादाय आयुक्तालयातील सहआयुक्त, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी, खाजगी क्षेत्रातील वित्त तज्ज्ञ तसचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची समिती बनवून या समितीच्या माध्यमातून राज्यातील धर्मादाय रुग्णालयांची नियमित तपासणी तसेच अचानक तपासणी करून गरीब रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळतात किंवा नाही याची माहिती घेतली जाईल.”

धर्मादाय रुग्णालयांची अद्ययावत माहिती यापुढे रुग्णांना ‘आरोग्य आधार’ या ॲपद्वारे तत्काळ मिळणार आहे. आयसीआयसीआय बँकेने सीएसआर निधीच्या माध्यमातून याबाबतचे एक ॲप तयार केले आहे. याचे सादरीकरण बुधवारी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या दालनात करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य आयुक्त धीरजकुमार, धर्मादाय आयुक्त महाजन तसेच आयसीआयसी बँकेचे अधिकारी आदी उपस्थित होते. ‘आरोग्य आधार’ हे ॲप कोणालाही मोबाईलवर डाऊनलोड करून घेता येईल.

हेही वाचा : आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये यापुढे सर्व उपचार मिळणार शंभर टक्के मोफत!

हे ॲप उघडल्यानंतर त्यावर संबंधित रुग्णाला हव्या असलेल्या जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयात नेमक्या किती खाटा राखीव आहेत याची माहिती मिळणार असून सदर रुग्ण त्या रुग्णालयात नोंदणी करू शकतो. अशी नोंदणी झाल्यापासून आठ तासांत रुग्णाने रुग्णालयात पोहोचणे आवश्यक आहे. रुग्णाची सर्व माहिती म्हणजे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला आदी सर्व ॲपद्वारे नोंदणी होणार आहे.

सदर ‘आरोग्य आधार’ ॲप मराठीत करणे व रुग्णांना त्यात सहज नोंद करण्यासाठी अधिक सुटसुटीत करण्याची सूचना आरोग्यमंत्री सावंत यांनी यावेळी केली. या ‘आरोग्य आधार’ ॲपमध्ये आरोग्य विषयक अन्य माहिती उपलब्ध असणार आहे. यात महात्मा फुले जनआरोग्य योजना, दिनदयाळ राज्य कर्मचारी योजना तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची माहिती उपलब्ध असणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charitable hospital reservation bed information aarogya adhar app tanaji sawant ssa