छत्रपती शिवरायांच्या ३९४व्या जयंतीच्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्रात उत्सवाचं वातावरण आहे. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांच्या शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील आदी नेतेमंडळी उपस्थित होती. आपल्या लाडक्या राजाच्या जन्मसोहळ्यासाठी शिवप्रेमी मावळ्यांनी किल्ले शिवनेरी सजवला होता. यावेळी पोलीस खात्याकडून सलामीही देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवजयंतीच्या निमित्ताने यावेळी शिवनेरीवरच्या पाळणाघरात महिलांनी पाळणागीत गायलं. यावेळी मोठ्या संख्येनं शिवप्रेमींनी शिवनेरीवर गर्दी केली होती. विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन शिवनेरीवर करण्यात आलं असून यात लहान मुलांनी छत्रपतींचा जीवनपट मांडणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. काही मुलांनी साहसी खेळांची प्रात्याक्षिकेही सादर केली.

अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या छत्रपतींच्या जन्मोत्सात सहभागी होता यावं, यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी शिवनेरीवर दाखल झाले होते. यावेळी संभाव्य गर्दीचं नियोजन करण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण खरदारी घेण्यात आली होती. शिवनेरीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आग्रा किल्ल्यावर दुमदुमणार शिवरायांचा जयघोष; ‘दिवाण-ए-आम’मध्ये साजरी होणार शिवजयंती!

आग्र्यातील किल्ल्यावरही शिवजयंतीचं आयोजन!

ज्या आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐतिहासिक सुटका करून घेतली होती, त्याच आग्रा किल्यातील दिवाण-ए-आममध्ये आज शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी होण्याचं हे दुसरं वर्षं आहे. आग्रा किल्ल्यावर यानिमित्ताने लेजर शोचंही आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यालाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थिती लावणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chatrapati shivaji maharaj jayanti at shivneri fort celibration pmw