कोपर्डीतील घटना ही शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला काळिमा फासणारी घटना आहे. हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या दोषींना त्वरीत जनतेसमोर फाशी द्यावी किंवा गोळ्या घालाव्यात असे स्पष्ट मत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
नाशिकमध्ये आज (शनिवार) मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात उदयनराजे सहभागी झाले होते. मोर्चानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, देशात लोकशाहीची दुरवस्था झाली आहे. लोकांचा न्याययंत्रणेवरील विश्वास उडाला आहे. भारताची गत लिबिया, सीरियासारखी करण्याचा प्रयत्न होत आहे.
स्पर्धेच्या जगात आरक्षणापेक्षा मेरिट हा एकमेव निकष असायला हवा. राज्यकर्त्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी आरक्षण देऊन समाज खराब केला आहे. मराठा समाजाचे नेतेच सत्ताधारी होते. परंतु त्यांनी काहीच केले नाही. मुख्यमंत्री, मंत्री मराठा समाजाचेच होते. त्यांनी समाजात एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही अशी टीका करत मराठा समाज कुठल्या समाजाविरोधात मोर्चे काढत नसल्याचे स्पष्ट केले. आजपर्यंत मराठ्यांनी तलवारीच्या जोरावर देशाचे संरक्षण केलेले आहे. कधी मतभेद केले नाहीत. राज्यातील मराठा हा सर्वात मोठा समाज आहे. मराठा ही जात नव्हे तर एक संस्कृती असल्याची पुस्तीही त्यांनी या वेळी जोडली.
उदयनराजे यांनी या वेळी केंद्रातील भाजप सरकारवरही टीका केली. केंद्र सरकार हे मेक इन इंडिया नव्हे तर ब्रेक इंडिया धोरण अवलंबत असल्याचा आरोप केला. एकीकडे उद्योगपती कोट्यवधींचे कर्ज बुडवतो तर शेतकरी मात्र पै-पै चुकवतो. उद्योगपतींचे हित जोपासणारे हे सरकार असल्याचेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, नाशिक येथे झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चात लाखोंचा जनसमुदाय लोटला होता. या मोर्चात छत्रपती खासदार संभाजीराजेंसह इतरही नेते सहभागी झाले होते. मोर्चा अत्यंत शांततेत व शिस्तीत निघाला.