कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाची लढत सर्वाधिक चुरशीची. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे समरजित घाटगे यांच्यात सामना होणार आहे. स्वाभाविकच दोघांनीही चांगलीच कंबर कसली आहे. जिथे मतदार तिथे जाऊन संपर्क ठेवण्यावर भर आहे. मुंबई, पुणे, इचलकरंजी येथील चाकरमानी गाठून संपर्क ठेवला जात आहे. अशीच एक भरगच्च संपर्क सभा इचलकरंजीत झाली. वक्ते नेत्याचा महिमा गात होते, कर्तृत्वाचे पोवाडे गात होते. आपला नेता किती प्रबळ, ताकदवर आहे हे दाखवण्याच्या भरात एका महिलेने ‘आमचे साहेब म्हणजे कुणी साधे सुधे नाहीत. दीडशे किलोचा पैलवान हायतीत ते. त्यांच्या खाली आले तर पलिकडच्याचा निभाव तरी लागेल का, असे म्हणत साहेबांचे वेगळ्याच पद्धतीने कौतुक केले. हे शब्द ऐकून साहेबांच्या चेहऱ्यावर स्मित खुलले. तर बाकीच्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद नोंदवला.

हेही वाचा >>> भाजपमध्ये उमेदवारीसाठी चिठ्ठ्यांचा खेळ !

असाही बेरकीपणा?

सोलापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र बनलेल्या अकलूजमध्ये महाविकास आघाडी आणखी बळकट करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा नागरी सत्कार सोहळा झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील तसेच महाविकास आघाडीच्या बहुसंख्य खासदारांच्या साक्षीने झालेल्या या सत्कार सोहळ्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर महायुतीच्या काही नेत्यांनीही हजेरी लावली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मोहोळ तालुक्यातील वजनदार नेते राजन पाटील-अनगरकर यांची दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीने राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. तरीही त्यांनी अकलूजच्या कार्यक्रमात लावलेली हजेरी आणि शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांची घेतलेली भेट हा विशेष चर्चेचा विषय ठरला. याबद्दल विचारले असता राजन पाटील यांनी केलेला खुलासा गमतीदार ठरला. सहकाराची पंढरी अकलूजमध्ये खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार सोहळा शरद पवार यांच्या हस्ते आणि विजयसिंह मोहिते-पाटील, कोल्हापूरचे छत्रपती, खासदार शाहू महाराज आदींच्या उपस्थितीत पार पडत असताना आपण हजर राहणे कर्तव्य समजतो. हा राजकारणाचा विषय कसा होईल, असा सवाल करीत राजन पाटील यांनी करून बेरकीपणाचे दर्शन घडविले.

औट घटकेचा मालक

सध्या सहकारी साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांचा हंगाम तेजीत आहे. या निमित्ताने कारखान्यावर प्रभुत्व असलेले नेते, गावोगावचे सभासद, अधिकारी- कर्मचारी यांच्या गाठीभेटी होत असतात. अशाच एका सभेवेळी एका शेतकऱ्याने ओळखीच्या व्यक्तीकडे पाहून ‘नमस्कार कारखान्याचे मालक!’ अशी साद घातली. त्याच्याबरोबर असलेल्या मित्राने संवादात भाग घेत त्या व्यक्तीकडे पाहत तुम्ही तर कारखान्याचे कर्मचारी आहात ना? असे विचारले. त्यावर कारखान्याच्या वेशभूषेत असलेला तो अधिकारी म्हणाला, म्हटले तर कारखान्याचा कर्मचारी आणि म्हटले तर मालक. नोकरीत कायम झालो आणि कारखान्याने सभासदत्व करून घेतले. त्या अर्थाने कारखान्याचा मालक झालो. पण दिवाळीनंतर मी निवृत्त होणार आहे. तेव्हा सभासदत्वाचा राजीनामाही द्यावा लागणार आहे. त्यामुळे मी औट घटकेचाच मालक. कायमस्वरुपी सभासदत्व कुठले आलेय?अशी खंत त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीच्या निमित्ताने कारखानदार कर्मचाऱ्यांना सभासद करून तात्पुरते मालक कसे बनवतात याचा मासलेवाईक नमुना पाहायला मिळाला.

(संकलन : एजाज हुसेन मुजावर, दयानंद लिपारे)