मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव आणि वायव्य मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने भाजपची पंचाईत झाली आहे. रवींद्र वायकर यांची रायगड जिल्ह्यातील जमीन खरेदी आणि जोगेश्वरीतील अनधिकृत हॉटेलच्या बांधकामावरून किरीट सोमय्या यांनी रान उठविले होते. त्यावरून ईडीनेही चौकशी करून कारवाई केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांनीही विधिमंडळ व जाहीरपणे उद्धव ठाकरेंसह या नेत्यांवर आरोप केले होते. यामिनी जाधव व त्यांचे पती यशवंत जाधव यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरू असून काही संपत्ती जप्तही केली आहे. राहुल शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे गटाने ध्वनिचित्रफीत व अन्य आरोप केले होते. आपणच ज्या नेत्यांच्या गैरव्यवहारांविरोधात आवाज उठविला, त्यांनाच निवडून देण्यासाठी प्रचार करण्याची वेळ भाजप नेत्यांवर आली आहे. जाधव आणि वायकर यांची नावे जाहीर होताच या मतदारसंघांतील स्थानिक भाजप नेते व पदाधिकाऱ्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या नेत्यांना तुरुंगात पाठविण्याची मागणी केली, त्यांचा प्रचार करण्याची वेळ आल्याने जनतेपुढे कोणत्या तोंडाने जायचे, असा प्रश्न पडला आहे. उमेदवारांविरोधात नाराजी असल्याने मतदानाची टक्केवारी कमी होण्याचीही भीती काही भाजप पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. पण शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करावयाचे असल्याने तीव्र नाराजी असूनही भाजप कार्यकर्ते व मतदार हे महायुतीलाच मतदान करतील, असेही त्यांना वाटत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा