राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच अधिक लक्ष्य केलेले दिसते. यातही कृषीमंत्री म्हणून पवारांच्या कार्यकाळावर अधिक टीका केली जाते. ह्य ‘महाराष्ट्रातील एक माजी मंत्री केंद्रात कृषी मंत्री होते’, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील प्रचार सभेत केले होते. त्यावर कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी ह्य ‘मीच तो ह्य अशी दिलखुलास दाद दिली. शेतकरी आत्महत्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पवारांना दोष दिला होता. त्यावर ‘अमित शहा यांना शेतीतील किती समजते आणि त्यांचे शेतीसंबंधीचे ज्ञान मर्यादित आहे’, असे प्रत्युत्तर पवारांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१३ आकडा कोणाला लाभदायक ?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खरी शिवसेना कोणती, यावर गेली पावणे दोन वर्षे काथ्याकूट सुरू आहे. शिंदे गटाकडून ठाकरे गटाला ‘उबाठा’ म्हणून हिणवले जाते. त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाने शिंदे गटाचे नामकरण ‘एसंशिं’ (एकनाथ संभाजी शिंदे) शिवसेना असे केले आहे. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाला झुकते माप मिळाले. यामुळे आपलीच शिवसेना खरी हा दावा शिंदे गटाकडून केला जातो. पण जनतेच्या न्यायालयात कौल कुणाला याचे उत्तर ४ जूनला मिळेल. लोकसभा निवडणुकीत ठाकरे आणि शिंदे गट १३ जागांवर समोरासमोर लढत आहे. यात मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. या १३ पैकी कोणता गट किती जागा जिंकतो यावरच सारे अवलंबून असेल. निवडणुकीच्या राजकारणात जनतेच्या न्यायालयातील निकाल हा अंतिम मानला जातो. यामुळेच या १३ जागांवर मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. कोल्हापूरमधील दोन्ही जागा कायम राखण्याकरिता शिंदे गेल्या दोन आठवड्यांत चार दिवस कोल्हापूरमध्ये ठाण मांडून बसले होते. आता ठाणे या बालेकिल्ल्यावर शिंदे यांनी सारे लक्ष केंद्रित केले आहे. शिंदे यांच्यासाठी सारा खेळ हा १३ जागांवरच आहे.

हेही वाचा >>> Lok Sabha Elections 2024: तिसऱ्या टप्प्यात चुरशीच्या लढती

राष्ट्रीय अध्यक्ष एका मतदारसंघापुरतेच ?

राष्ट्रवादीतील फुटीपूर्वीच अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा निवडणूक आयोगाकडे दावा केला. निवडणूक आयोगाने हा दावा मान्यही केला. महाराष्ट्रात लोकसभेच्या चार आणि लक्षद्वीपमध्ये एक अशा पाच जागा अजितदादांचा राष्ट्रीय पक्ष लढवत आहे. शरद पवार हे एकत्रित राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्यांना साडेतीन जिल्ह्यांच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून हिणवले जात असे. राष्ट्रवादीची ताकद साडेतीन जिल्ह्यांपुरतीच असे भाजपचे नेते अजूनही नाके मुरडतात. मग अजित पवारांचा पक्ष किती जिल्ह्यांचा हा प्रश्न पडतो. कारण लोकसभा निवडणुकीत अजित पवार गेले १५ दिवस बारामतीमध्ये ठाण मांडून बसले होते. उस्मानाबादमध्ये पक्षाचा उमेदवार असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेकडे अजितदादा फिरकले नव्हते. यावरून अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष की बारामतीचे अध्यक्ष, असा सवाल आता शरद पवार गटाचे नेते करू लागले आहेत.

लक्ष्मीदर्शन !

वाढत्या उकाड्यानं बेजार झालेला गणूअण्णा मारुतीच्या देवळासमोर वाकाळं घेऊन काय आला न्हाय. तवा पांडूतात्यानं देवळापास्नंच हाळी दिली. अरे अण्णा येत न्हायसं का झोपायला. तर गणूअण्णांन तात्यानं पसरलेल्या वाकळवर बुड टेकत म्हटलं, न्हायबा आज जरा दारातच पडावं म्हणतुया असं सांगितलं. तंबाखूची चंची कंबरतनं भाईर काढली. तंबाखू मळतच म्हटलं, तात्या तूबी जा की घराकडं. का रं? अण्णांनं उशाच्या तांब्यातल्या पाण्यानं चूळ भरत इचारलं. आरं, उद्या मत द्यायची हायत नव्हं, मग रातचं लक्ष्मी दारात याची अन् दार बंद बघून आल्या पावली परतायची. तस व्हायला नगं म्हणून आजच्या रातीला उकाडा असला तरी दार खुलं सोडून पडायचं. तात्यानं हे ऐकलं अन् म्हणाला, येडा का खुळा रं तू? हे इलेकशन गावच्या पंचाच न्हाय, दिल्लीच हाय, तुला लक्ष्मीदर्शन व्हायला तू काय तालेवार हायसं का. गपगुमान गणूअण्णांन देवळासमोर वाकाळ बघून पाय पसरलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavadi maharashtra political crisis political turmoil in maharashtra zws
Show comments