मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्री व नेत्यांनी भेटूनही आज निळवंडेतून जायकवाडीत सोडण्यात आलेले पाणी थांबविता आले नाही. आता उद्या (गुरुवारी) मुंबईत मंत्री व अधिका-यांची बैठक झाल्यानंतर निर्णय होईल असे आश्वासन मात्र त्यांना मिळाले. लोकक्षोभाला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांनीच आंदोलने सुरू केली आहेत.
जायकवाडी धरणात मंगळवारपासून पाणी सोडायला सुरुवात केल्यानंतर लाभक्षेत्रातील पालकमंत्री मधुकर पिचड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे हे एकत्र आले. त्यांनी जलसंपदामंत्री तटकरे यांची भेट घेतली. या वेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, शंकरराव गडाख, माजी आमदार जयंत ससाणे, बाजार समितीचे सभापती दीपक पटारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन गुजर हे उपस्थित होते. जायकवाडीत १० टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. त्याचे नियोजन कसे केले, असा प्रश्न त्या वेळी उपस्थित करण्यात आला. तटकरे यांनी जायकवाडीतून मागील वर्षी शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले नव्हते. आता दोन आवर्तनांसाठी १० टीएमसी पाण्याची गरज आहे. धरणात २२ टीएमसी जिवंत पाणीसाठा आहे. हे पाणी पिण्यासाठी व उद्योगाला लागेल. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातील धरणातून १० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रवरा नदीपात्र ओले आहे. बहुतेक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी आहे. त्यामुळे आता पाणी सोडले तर तूट येणार नाही. तसेच शेतक-यांना पीक नियोजन करता येईल असे त्यांनी या वेळी सांगितले. त्यावर नगरच्या नेत्यांनी मराठवाडा व नगरच्या पाण्याचा हिशोब करून नियोजन करून, लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून निर्णय घ्यायला हवा होता असे सांगितले. आधी सर्व पाण्याचा हिशोब करा, कोणत्या धरणातून किती पाणी सोडणार, कधी सोडणार, हे ठरवा. जायकवाडीच्या पाण्याचाही हिशोब करा, असा आग्रह या वेळी धरण्यात आला. त्यानंतर कुठे तटकरे यांनी उद्या अधिका-यांची बैठक घेऊन या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले. पण त्यांनी जायकवाडीसाठी सोडलेले पाणी थांबविण्यास स्पष्ट नकार दिला.
काँग्रेसचे मंत्री थोरात, विखे, आमदार कांबळे, ससाणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही भेट घेतली. निळवंडे व भंडारदरा धरणांच्या लाभक्षेत्रात काँग्रेसचे तीन आमदार आहेत. पण त्यांना तटकरे यांनी विश्वासात घेतले नाही. राजकारणात किंमत मोजावी लागेल असा निर्णय करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले पाहिजे. पण पक्षीय द्वेष व राजकीय धोरणातून तटकरे हे राष्ट्रवादीचे असल्याने स्वत:च्या मर्जीप्रमाणे निर्णय करत आहेत असा आरोप करण्यात आला. मुख्यमंत्र्यांना या निर्णयाची माहिती नव्हती. मात्र त्यांनी पाणी बंद करण्यास नकार दिला. उद्या गुरुवारी तटकरे, सचिव मालिनी शंकर तसेच अधिका-यांची बैठक घेऊन निर्णय करून कुणावरही अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.