मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विनायक मेटे मराठा व ओबीसी समाजात भांडणे लावून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगाबादमधील घटना हा केवळ मेटे यांना इशारा होता, त्यांनी हे उद्योग थांबवले नाहीत व पुन्हा मराठा आरक्षण जागर परिषद घेतल्यास मेटे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा छावा युवा संघटना, ओबीसी सेवा संघ, बारा बलुतेदार सेवा संघ, अखिल भारतीय छावा संघटना यांनी दिला आहे.
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय सावंत, ओबीसी संघाचे अशोक सोनवणे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सांगळे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना हा इशारा दिला. मराठा आरक्षण चळवळीच्या पाठीत मेटे यांनी खंजीर खुपसला आहे, त्यांनी प्रथम राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन आरक्षण मागण्यासाठी रस्त्यावर उतरावे, केवळ आमदारकी टिकवण्यासाठीच ते चळवळीचा वापर करत आहेत, विधान परिषदेवरील त्यांची मुदत संपल्यानेच राष्ट्रवादीला उपद्रवमूल्य दाखवून देण्यासाठीच त्यांच्यातील मराठा अस्मिता जागृत झालेली आहे, आरक्षणाच्या मुद्यावर सर्व मराठा समजाच्या २२ संघटना शाहूमहाराजांचे वंशज संभाजीमहाराज यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्या असताना मेटे समाजाची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप सावंत यांनी केला.
कोणत्याही ओबीसी संघटनांनी मराठा समाजाच्या आरक्षणास विरोध केला नाही, विरोध आहे तो केवळ मंत्री छगन भुजबळ यांचाच, ते एकवेळ माळी समाजाचे नेते आहेत, मराठा समाजास आरक्षण देण्याच्या नचिप्पन समितीच्या शिफारशींना ओबीसी संघटनांनी पाठिंबाच दिला आहे, परंतु केवळ राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी भुजबळ व मेटे एकमेकांना विरोध करत आहेत, मेटे यांच्या जागर परिषदेत केवळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी आहेत, ओबीसी व मराठा यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचा मेटे व भुजबळ यांचा प्रयत्न आहे, असा आरोप संघाचे सोनवणे यांनी केला.
मेटे हे शरद पवार यांचे राजकीय दलाल आहेत, स्वत:ची राजकीय दुकानदारी चालवण्यासाठीच मेटे मराठा समाजात वाद निर्माण करत आहेत, अशी टीका सांगळे यांनी केली.
‘मेटे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही’
औरंगाबादमधील घटना हा केवळ मेटे यांना इशारा होता, त्यांनी हे उद्योग थांबवले नाहीत व पुन्हा मराठा आरक्षण जागर परिषद घेतल्यास मेटे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा छावा युवा संघटना, ओबीसी सेवा संघ, बारा बलुतेदार सेवा संघ, अखिल भारतीय छावा संघटना यांनी दिला आहे.
First published on: 19-08-2013 at 12:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chawa union warns to mete dont wandering in maharashtra