खुल्या बाजारात तुर डाळीचे चढे भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर पाऊल उचलण्यास सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्ह्य़ात १४ ठिकाणी तुरडाळ विक्री केंद्र सुरु केली जाणार आहे. जिल्हा प्रशासन आणि किरकोळ व्यापारी संघटना यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाणार आहे. १२० रुपये प्रतिकीलो प्रमाण चांगल्या प्रतीच्या तुरडाळीची विक्री या माध्यमातून केली जाणार आहे.
देशभरात सध्या तुर डाळीचा तुटवडा जाणवतो आहे. यामुळे तुर डाळीचे भाव खाते आहे. गेल्या काही महिन्यात खुल्या बाजारात तुरीने प्रतिकिलो २०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे जनसामान्यांच्या जेवणातून तुर दिसेनाशी होत चालली आहे. राज्यभरात तुरडाळीचा साठेबाजार करणाऱ्या विरोधात मोहिम राबवल्यानंतर आता रेशन दुकाने आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडून रास्त भावात तूर डाळ विक्री सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाआहे. याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्ह्य़ात १४ ठिकाणी रास्त भावात तुरडाळ विक्री केंद्र सुरु करण्यात आली आहेत. यात पनवेलमधील ११ तर अलिबागमधील ३ केंद्रांचा समावेष आहे. टप्प्याटप्याने जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांत अशी तुरडाळ विक्रीकेंद्र सुरु केली जाणार आहेत. खालापुर येथील कंपनीने यासाठी चांगल्या दर्जाची तुरडाळ शासनमान्य दरात उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवली आहे.
बाजारपेठेत तूरडाळीच्या किरकोळ दरामध्ये वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच्या दृष्ठीने राज्यशासनामार्फत केंद्र शासनाकडून तुरीची खरेदी करून त्यापासून प्राप्त होणारी तुरडाळ खुल्या बाजारात स्वत दराने वितरीत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार स्वस्त तुरडाळ विक्री केंद्रसुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या केंद्रावर तुरडाळीचा दर प्रतिकिलो रुपये १२० असा आहे. ही तुरडाळ खुल्या बाजारात विकण्यात येणार आहे. मुंबईमध्ये दि ग्रेन राईस अॅन्ड ओईलसीड्स र्मचट्स असोसिएशन नवी मुंबई, अपना बाजार सहकारी भंडार, महिला आíथक विकास महामंडळ, रिटेल मार्केट असोसिएशन, बिग बजार, रिलायन्स फ्रेश, डी-मार्ट,मुंबई ग्राहक पंचायत इत्यादीमार्फत नियंत्रित, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्यामार्फत निर्णय घ्यायचा आहे. पुणे, नागपूर व औरंगाबाद या जिल्ह्य़ांमध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन तुरडाळ विक्री केंद्र सुरु करायची आहेत.
शिधावाटप केंद्रांमध्ये बिपीएल कार्ड धारकांना ही डाळ मिळणार आहे. ज्या संस्थांना रास्तभावात तुर डाळ विक्रीकरण्याची इच्छा आहे त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन रायगडचे जिल्हा पुरवठा अधिकारी लिलाधर दुफारे यांनी दिली.