प्रदीप नणंदकर
लातूर : राज्यात उसाच्या लागवडीखालील क्षेत्र पंधरा लाख हेक्टपर्यंत पोहोचले आहे. साखर उत्पादनात संपूर्ण जगात भारताचा पहिला क्रमांक आहे. मात्र उसाच्या बेण्यातही शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने त्याचा थेट परिणाम उत्पादकतेवर होतो. बियाणांची शुद्धता नसल्याने अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते आहे.
भारतातील हेक्टरी उत्पादकता ८० टन असून विदेशातील उत्पादकतेचे प्रमाण १०० टनापर्यंत आहे. उसाच्या सुमारे १५० जाती आहेत. जगातील पहिले ऊस संशोधन केंद्र हे कोयंबतूर येथे सुरू झाले. उसाच्या तुऱ्यावर बिया येतात व त्या बियांपासून बेणे तयार केले जाते. उसाच्या कांडीपासून ऊस तयार होतो असा समज आहे, मात्र वास्तव वेगळे आहे. प्रयोगशाळेत संशोधन करत क्रॉस बीड वापरत रोपे तयार केली जातात. उसाची उत्पादकता ही वातावरण, शेतीची केलेली मशागत, दिले जाणारे पाणी व बियाणाची शुद्धता यावर अवलंबून असते. कोयंबतूरनंतर पाडेगाव येथेही क्रॉस बीड तयार करून अनेक जाती तयार करण्यात आल्या. तिसरे केंद्र वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचे असून मुंबई-गोवा मार्गावर अंबोली घाटात शंभर एकर जागा संस्थेने घेतली आहे. या ठिकाणी उसाच्या तुऱ्याला बिया येत असल्याचे आढळले व या जागेवर उसाची लागवड करून त्याच्या बियापासून बेणे तयार केले जाते.
देशात उसाच्या कोयंबतूर ८६,०३२, कोयंबतूर ६०१ ,पाडेगाव संशोधन केंद्राने २६५ ही सुधारित जात, तर वसंत दादा शुगर इन्स्टिटय़ूटने ८००५ ही नवीन सुधारित जात संशोधित केली. अलीकडेच पाडेगाव संशोधन केंद्रांमध्ये ६७१ नंतर दहा हजार एक हे वाण विकसित करण्यात आले आहे, यात साखरेचा उतारा चांगला मिळतो.
शासन मान्यतेने सुरू झालेल्या कृषी विज्ञान केंद्रांव्यतिरिक्त खासगी नर्सरीचे प्रमाण जास्त आहे. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. ना शासनाचे, ना कृषी विभागाचे. आपली उत्पादकता वाढावी यासाठी अनेक शेतकरी बेणे जिकडे उपलब्ध होईल तिकडे जाऊन ते खरेदी करतात. त्यांना सांगितलेली जात एक असते, प्रत्यक्षात बेण्याची शुद्धता नसते.
उसाच्या बेण्याच्या बाबतीत त्याची शुद्धता योग्य आहे की नाही ? शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने बियाणे मिळते आहे की नाही ? याची तपासणी व्हायला हवी. शेतकऱ्याची फसवणूक झाली तर संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची तरतूद हवी व शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळायला हवी.
– डॉ. सचिन डिग्रसे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, लातूर</p>
ऊस हे मूळ भारतातील पीक असूनही आज जगातील अन्य देशात उत्पादकता आपल्यापेक्षा अधिक आहे. आपल्याकडील उत्पादकता वाढावी यासाठी जसे नवीन वाण संशोधित व्हायला हवेत. त्याचबरोबर त्याच्या गुणवत्तेची शुद्धता टिकवण्यासाठी शासनानेही लक्ष घातले पाहिजे.
– बी. बी. ठोंबरे, कार्यकारी संचालक, नॅचरल शुगर, रांजणी