नितीन पखाले

यवतमाळ : भाजप परिवारातील अभाविप कार्यकर्ती मीरा फडणीस हिने संघ परिवारातील लोकांनाच जाळय़ात ओढून त्यांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केली आहे. मीरा फडणीसचा चंद्रपूरमध्ये संघाच्या शाखेपासून सुरू झालेला प्रवास थेट तुरुंगापर्यंत पोहोचला आहे.

केंद्रीय पर्यटन विभागाच्या योजनेत गुंतवणुकीच्या नावावर यवतमाळमधील अनेकांची दीड कोटी रुपयांची, तर विविध शहरांतील ७० लोकांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात मीरा प्रकाश फडणीस (५२, रा. अभंग गणेश विहार जगताळे ले-आऊट अमरावती) हिला पोलिसांच्या यवतमाळ आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. न्यायालयाने तिला ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कृत्यात उत्तरप्रदेशातील अनिरुद्ध होशिंग हाही सामील होता. ऑगस्ट २०२३ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी पोलिसांनी होशिंग याला अटक केली होती. मीरा अटक टाळण्यासाठी प्रयत्न करीत होती. न्यायालयाने तिचा नियमित जामीन अर्ज फेटाळल्यापासून ती फरार होती.

हेही वाचा >>>“गाढवाला चंदन लावलं तरीही ते उकिरड्यावर…”, तुकोबांचा अभंग वाचत देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

मीरा फडणीस हिने सप्टेंबर २०२२ मध्ये आपण केंद्रीय पर्यटन विभागाच्या सल्लागार समितीत संचालक झाल्याचे सांगितल्यानंतर यवतमाळ येथील संघाच्या कार्यकारिणीनेही तिचा सत्कार केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यावेळी फडणीस हिने ‘एमओटी’ (मिनीस्ट्री ऑफ टुरिझम) नावाचा व्हॉट्सअ‍ॅप समूह सुरू केला आणि तेथूनच पर्यटन विभागाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवून लाखो रुपये कमविण्याचे प्रलोभन संघ परिवारातील अनेकांना दाखविले. शिवाय, पर्यटन विभागाला वाहने भाडेतत्वावर देऊन महिन्याला लाखो रुपये कमावण्याची योजनाही तिने जाहीर केली, असा आरोप तिच्यावर आहे. तसेच मुंबईतील ताज हॉटेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत या योजनेचे उद्घाटन होईल आणि तेथेच गुंतवणूकदारांना ५० टक्के रक्कम आणि चार महिन्यांचे आगावू देयक दिले जाईल, अशी थापही तिने मारली. या कार्यक्रमाच्या खोटय़ा निमंत्रण पत्रिकाही तिने छापल्या होत्या, असा आरोप आहे.अभाविपची कथित कार्यकर्ती असलेली मीरा फडणीसने पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांबरोबरच्या छायाचित्रांचा गैरवापर करून गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांना गंडा घातला..

गुन्ह्याची पद्धत..

’अभाविपची कार्यकर्ती मीरा फडणीस आणि अनिरूद्ध होशिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव वापरले. एका माजी मुख्यमंत्र्याची काकू असल्याची बतावणीही तिने केली आणि नामसाधम्र्याचा गैरफायदा घेतला. खोटे शिक्के, कागदपत्रे, राजमुद्रेचाही गैरवापर केला, असा आरोप आहे.

’लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी मीरा फडणीस आणि होशिंग यांनी केंद्रातील अनेक मंत्री, भाजपचे नेते यांच्याबरोबरच्या छायायित्रांचा गैरवापर केला. नागपूर येथील संघाच्या मुखपत्रात काम करणाऱ्यांचा फसवणूक झालेल्यांमध्ये समावेश आहे.

’रेल्वेतील पर्यटन गाडीच्या कामांचे कंत्राट देण्याच्या नावाखालीही या दोघांनी अनेकांना गंडा घातला आहे. मीराची मुलगी शर्वरी हीही या सर्व प्रकरणात सामील असल्याचे तक्रारदारांनी सांगितले.

Story img Loader