Chhagan Bhujbal Angry on Ajit Pawar NCP : महायुती सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील (अजित पवार) वरिष्ठ नेते तथा माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना या मंत्रिमंडळातून वगळल्यामुळे त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे. मराठा आरक्षणावरून घेतलेली आक्रमक भूमिका, त्यावरून महायुतीत पक्षाची झालेली गोची, मुलाला विधान परिषदेत पाठवलेलं असताना पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघात केलेली बंडखोरी, चौकशीत अडकलेली प्रकरणे आदींचा संबंध भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यास कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये अनेक वेळा त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. आज पुन्हा एकदा त्यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंत्रिपद मिळाल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ म्हणाले, “आज मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी माझ्या कार्यकर्त्यांनी मला मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांचं दुःख, निराशा व उद्विग्नता व्यक्त केली. मी त्यांना मागील पाच-सहा महिन्यात म्हणजेच लोकसभा निवडणुकीपासून जे काही घडलं त्याचा इतिहास सांगितला. आता मी माझ्या मतदारसंघात जात आहे. माझ्या लोकांशी चर्चा करेन. राज्यभरातील कार्यकर्ते, समर्थक, समता परिषदेतील लोक उद्या मला भेटणार आहेत. मी त्यांच्याशी चर्चा करून माझी भूमिका ठरवेन. परंतु, मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि सर्व हितचिंतकांना सांगितलं आहे की तुम्हाला जो काही निषेध नोंदवायचा आहे तो शांतपणे करा. सर्वांच्या मनात निराशा आहे, परंतु मोबाईलवर, समाजमाध्यमांवर व्यक्त होताना किंवा कुठेही प्रसारमाध्यमांसमोर बोलत असताना असंस्कृतपणे बोलू नका, शिवीगाळ करू नका, ‘चप्पल मारो’सारखं आंदोलन करू नका. लोकशाहीत सर्वांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु, कुठेही असंस्कृतपणा दाखवू नका. शब्द जपून वापरा, असे मी सर्वांना सांगितला आहे”.

हे ही वाचा >> “मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का?” भुजबळांचा प्रफुल्ल पटेलांवर संताप; राष्ट्रवादीत जुंपली

छगन भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया

दरम्यान भुजबळ यांना यावेळी विचारण्यात आलं की तुमचं मंत्रिपद नेमकं कोणी नाकारलं? त्यावर भुजबळ म्हणाले, माझं मंत्रिपद कोणी नाकारलं ते शोधावं लागेल. तेच शोधण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. परंतु, हा निर्णय पक्षांच्या प्रमुखांचा असतो. म्हणजेच भाजपामध्ये कोणाला मंत्रीपद द्यायचं, कोणाला द्यायचं नाही तो निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात. शिवसेनेबाबतचे निर्णय एकनाथ शिंदे घेतात. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) निर्णय अजित पवार घेतात. सर्वांनाच मंत्रिपद हवं असतं. परंतु, इथे प्रश्न मंत्रिपदाचा नाही. ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्या अवहेलनेचा हा विषय आहे. त्या संदर्भात मी उद्या सर्वांसमोर बोलेन.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal angry as dropped from ministry ajit pawar ncp rajya sabha asc