Chhagan Bhujbal Angry on Praful Patel over Ministerial Post Unhappy with NCP : देवेंद्र फडणवीस सरकारचा विस्तार नुकताच पार पडला आहे. मात्र, या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे भुजबळांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. स्वतः भुजबळ यांनी देखील यावरून नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, भुजबळांच्या नाराजीबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील (अजित पवार) वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, “छगन भुजबळांना राज्यसभेवर जायचं होतं, आम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दर्शवली आहे”. पटेलांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “सहा महिन्यांपूर्वी मी राज्यसभेवर जायची इच्छा व्यक्त केली होती. मात्र तेव्हा मला नकार देण्यात आला आणि आता मी आमदार म्हणून निवडून आलो आहे तर आता मला राज्यसभेवर जायला सांगतायत. मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का?”
प्रफुल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, “नक्कीच मी सहा महिन्यांपूर्वी राज्यसभेवर जाण्याची इच्छा वरिष्ठांपुढे व्यक्त केली होती. परंतु, तेव्हा त्यांनी मला नकार दिला. ते मला म्हणाले, ‘आता आपण सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणार आहोत’. त्यावर माझी काही हरकत नव्हती. त्यानंतर त्यांनी मकरंद पाटील यांच्या भावाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा देखील मी राज्यसभेचा विषय काढला होता. मात्र वरिष्ठांनी मला नकार दिला. त्यांनी सांगितलं की ‘आम्ही मकरंद पाटील यांना शब्द दिला आहे’. तेव्हा मला सांगण्यात आलं की ‘तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. तुमच्याशिवाय येवला मतदारसंघात विजय मिळणं कठीण आहे. तुम्ही निवडणूक लढत असाल तर आपले कार्यकर्ते जोमाने राज्यभर काम करतील’. मी त्यावरही हरकत घेतली नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मी व माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि आता मी विधानसभा निवडणुकीत जिंकलो आहे. आता ते लोक मला म्हणतात की ‘आपण मकरंद पाटील यांना मंत्री केलं आहे. आता त्यांच्या भावाला आपण राजीनामा द्यायला सांगू आणि तुम्हाला आपण राज्यसभेवर पाठवू’. परंतु, त्यासाठी मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. मी असं केलं तर ही माझ्या मतदारसंघातील लोकांची प्रतारणा होणार नाही का? मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का?”
हे ही वाचा >> “सिगरेटच्या लायटरनं त्याचे डोळे जाळले, मृतदेहावर उड्या मारल्या”, विरोधी पक्षांकडून बीड घटनेचा निषेध करत सभात्याग!
छगन भुजबळांचा प्रफुल्ल पटेल, अजित पवारांवर संताप!
छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल व अजित पवारांवरील नाराजी जाहीर करत म्हणाले, “मला त्यांना विचारायचा आहे, मी तुमच्या हातातलं लहान खेळणं आहे का? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला म्हणाल, राज्यसभेवर जा, तुम्ही म्हणाल बस तेव्हा बसायचं, तुम्ही उठ म्हणाल तेव्हा उठायचं, तुम्ही म्हणाल तेव्हा निवडणूक लढवायची… ते सगळं जाऊ द्या, मी जर उद्या माझा राजीनामा दिला तर माझ्या मतदारसंघातील लोकांना काय वाटेल? ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतली त्यांना काय वाटेल? त्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलं आहे आणि आता निवडणूक झाल्यावर महिनाभरात मी राजीनामा कसा देऊ? उलट मी माझ्या वरिष्ठांना म्हटलं की मला थोडे दिवस द्या. माझ्या मतदारसंघातील कामं मला पूर्ण करू द्या. एक-दोन वर्षांनी आपण यावर विचार करू. परंतु, तुम्ही म्हणाल बस बस तर मी बसायचं… तुम्ही म्हणाल उठ उठ तर मी उठायचं… हा छगन भुजबळ तसा माणूस नाही”.