“भारताच्या स्वातंत्र्यासाठी लाखो तरुणांनी वंदे मातरम म्हणत स्वतःला फासावर लटकवून घेतलं तेव्हा म्हटलेलं वंदे मातरम गीत तुमचं आमचं राष्ट्रगीत नाही. १८९८ साली पंचम जॉर्ज राजाच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोर यांना ‘जन गण मन’ हे गीत सुचलं” असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. ते रविवारी पिंपरी – चिंचवडमध्ये बोलत होते. १५ ऑगस्ट हे हांडगे स्वातंत्र्य असलं तरी पत्करले पाहिजे. सबंध देशावर हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन दुःखाचाही आहे, त्या दिवशी कडकडीत उपवास करायचा असेही ते म्हणाले. भिडे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी भिडे यांना अटक करावी अशी मागणी केली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, संभाजी भिडे म्हणजेच मनोहर भिडे यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला पाहिजे. कारण त्यांनी सांगितलं की, १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन नाही. आपला लोकप्रिय असलेला तिरंगा झेंडा हा आपला राष्ट्रध्वज नाही. जन गण मन हे आपलं राष्ट्रगीत नाही. परंतु असं वक्तव्य दुसऱ्या कोणी केलं असतं. तर त्याला आतापर्यंत देशद्रोहाच्या आरोपाखाली ताबडतोब अटक केली असती. परंतु यांच्यावर कारवाई का होत नाही?

हे ही वाचा >> “सबका साथ, सबका विकासच्या नावाखाली आमची…”, राजू शेट्टींचा भाजपावर संताप, म्हणाले, “त्यांचं गुजरात मॉडेल…”

छगन भुजबळ म्हणाले, भिडे वाटेल तशी बडबड करतात. तर कधी सांगतात माझ्या बागेतले आंबे खा मग पोरं होतील, मुलगा होईल, अमूक होईल, तमूक होईल. वाटेल ती बडबड करतात. मनोहर असलेलं नाव बदलून संभाजी असं नाव लावतात आणि बहुजन समाजाच्या पोरांना फितवायचं काम करतात.