आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळाले असते, तर सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावे लागले नसते. नोकरीतील टक्का कमी झाला, परिणामी हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली, असं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केलं होतं. यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे-पाटलांवर हल्लाबोल केला आहे.
हिंगोलीतील ओबीसी सभेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “आमची लायकी काढतो? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक अठरापगड जातीतील बहुजन मावळ्याकडे लायकी होती. म्हणून ते मावळे शिवरायांसाठी लढले.”
हेही वाचा : “…कुणबी प्रमाणपत्रांना तत्काळ स्थगिती द्या”, मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आक्रमक
“महात्मा फुलेंची लायकी होती, म्हणून शिवरायांची समाधी शोधून काढली. शिवजयंती महात्मा फुलेंनी सुरू केली. शिवरायांचा पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला. तुम्ही कुणाची लायकी काढता?” असा संतप्त सवाल भुजबळांनी विचारला आहे.
“भीमा-कोरेगाव येथे पेशवाईला लोळवणारे महार सैनिकांची लायकी होती, म्हणून हजारो पेशवांच्या सैनिकांना कापून काढले. ओबीसी समाज हा देशाचा निर्माणकर्ता आहे,” असं भुजबळांनी सांगितलं.
हेही वाचा : “मला म्हातारा म्हणतोय, पण माझ्या डोक्यावरचे केस…” छगन भुजबळांचा मनोज जरांगेना टोला
जरांगे-पाटील काय म्हणाले होते?
“मराठा समाजातील मुलांना ९५ टक्के पडूनही नोकरी लागत नाही. आमची मुले हुशार असतानाही, आरक्षणात बसत असूनही आरक्षण नसल्याने लाखो मुले सुशिक्षित बेरोजगार राहिले. हेच आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळाले असते, तर सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावे लागले नसते. नोकरीतील टक्का कमी झाला, परिणामी हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली,” असं विधान जरांगे-पाटलांनी केलं होतं.