Chhagan Bhujbal Angry on Mahayuti Over Lok Sabha Election : सात महिन्यांपूर्वी देशात लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठं अपयश पाहावं लागंल होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, अशा बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या. भुजबळांनी लोकसभेची तयारी देखील केली होती. मात्र, त्यांना महायुतीकडून लोकसभेचं तिकीट मिळालं नाही. उशिरापर्यंत नाशिकचा उमेदवार महायुती जाहीर करू शकली नव्हती. भुजबळांनी त्यावेळी या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. मात्र, आता भुजबळ यांनी सांगितलं की “मी महिनाभर नाशिक लोकसभेची तयारी केली होती. मात्र महायुतीच्या लोकांनी तेव्हा कच खाल्ली”. सात महिन्यांपासून भुजबळांच्या मनात जी खदखद होती ती आज बाहेर पडली.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी जे काही घडलं ते देखील सांगितलं आहे. यासह प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरही भुजबळांनी संताप व्यक्त केला आहे.
छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी नाशिकमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांऱशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही लोकसभा निवडणुकीला उभे राहा. होळीच्या दिवशी ही सगळी चर्चा झाली होती. मला सांगण्यात आलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत की छगन भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभा निवडणुकीला उभं करू. मला हे सांगण्यात आल्यानंतर मोठा धक्का बसला. मी सर्वांना सांगितलं की मला विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या. मला किमान २४ तास द्या, मी विचार करून सांगतो. त्यानंतर होकार कळवला. मी महिनाभर माझ्या मतदारसंघात तयारी केली. परंतु, देशभरातील उमेदवारांची नावे जाहीर होत होती. महाराष्ट्रातील कित्येक उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. मात्र, नाशिकमधून माझं नाव जाहीर केलं गेलं नाही”.
हे ही वाचा >> “मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का?” भुजबळांचा प्रफुल्ल पटेलांवर संताप; राष्ट्रवादीत जुंपली
छगन भुजबळांचा महायुतीला टोला
छगन भुजबळ म्हणाले, “मी नाशकात सर्व तयारी केली होती. मी नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढत आहे हे समजल्यानंतर या मतदारसंघातील दलित, मुस्लिम, आदिवासी व ब्राह्मण संघटनांचे पदाधिकारी मला भेटले. या सर्व संघटना माझ्याबरोबर उभ्या राहिल्या. कारण या सगळ्यांना नाशिकच्या विकासामध्ये रस होता. दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जवळपास सर्व उमेदवारांची नावे जाहीर होत होती. परंतु, माझं नाव जाहीर केलं नाही. मग मी त्यांना (महायुतीमधील वरिष्ठ नेते) म्हटलं, आता मी माघार घेतो. मी तुमच्या निर्णयाकडे आस लावून, डोळे लावून बसणार नाही, तुमच्या तिकिटाची वाट बघणार नाही. तेव्हा या लोकांनी कच खाल्ली आणि मला तिकीट दिलं नाही.