Chhagan Bhujbal dropped from Ministerial Post Unhappy with NCP : महायुती सरकारचा विस्तार नुकताच पार पडला आहे. मात्र या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान दिलेलं नाही. त्यामुळे भुजबळांच्या समर्थकांना धक्का बसला आहे. पक्षातील वरिष्ठांनी व महायुतीच्या नेत्यांनी मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत. भुजबळांनी त्यांची नाराजी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली आहे. तसेच त्यांना पुढच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. नाराज भुजबळांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की तुम्ही आता नागपूरमधील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नाही का? पक्षाने डावलल्यानंतर तुमची आता पुढची भूमिका काय असेल? यावर भुजबळ म्हणाले, “आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”.
छगन भुजबळ म्हणाले, “मंत्रिमंडळातून मला का काढलं याबाबत मला माहिती नाही. परंतु, सात-आठ दिवसांपूर्वी माझं वरिष्ठांशी बोलणं झालं होतं. त्यावेळी ते (अजित पवार आणि इतर) मला म्हणाले, तुम्हाला राज्यसभेवर जायचं असेल तर आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवू. मी त्यांना म्हणालो, जेव्हा मला राज्यसभेवर जायचं होतं तेव्हा तुम्ही मला ती संधी दिली नाही. तेव्हा तुम्ही मला सांगितलं की विधानसभेची निवडणूक लढवा. तुम्ही विधानसभा निवडणूक लढवलीच पाहिजे. तुमच्याशिवाय येवला मतदारसंघाची निवडणूक जिंकता येणार नाही. तुम्ही लढत असाल तर पक्षाला जोम येईल. पक्ष व कार्यकर्ते राज्यभर जोमाने काम करतील. त्यामुळे तुम्ही लढलंच पाहिजे, असं मला सांगितलंत. तुमच्या त्या सल्ल्यानंतर मी विधानसभा निवडणूक लढवली. येवल्यातील जनतेने मला मोठा आशीर्वाद देत निवडून दिलं. आता मी तुमच्या सांगण्यावरून आमदारकीचा राजीनामा देऊ शकत नाही. तसं केल्यास माझ्या मतदारसंघातील जनतेची प्रतारणा होईल.
हे ही वाचा >> सातारा-पुणे तुपाशी, तर अर्धा विदर्भ उपाशी! राज्यातील १७ जिल्हे मंत्रिपदापासून वंचित
वरिष्ठांच्या ऑफरवर भुजबळ काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले, “राज्यसभेवर जाण्यासाठी मला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. मी तसं केल्यास माझ्या लोकांसाठी ते दुःखदायक असेल. माझे मतदार रागावणार नाहीत, परंतु निश्चितपणे त्यांच्या मतांची प्रतारणा होईल, जे मी करू शकत नाही. ज्यांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केलं त्या लोकांशी मी असं वागणार नाही. आठ दिवसांपूर्वी माझ्या वरिष्ठांनी मला की ऑफर दिली होती. परंतु, मी त्यांना स्पष्टपणे नकार कळवला आहे. मी आमदारकीचा राजीनामा देऊ शकत नाही, असं त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे. कारण माझा राजीनामा देणं म्हणजे मतदारांचा विश्वासघात ठरेल. त्यामुळे मी सध्या तरी राजीनामा देणार नाही. एक दोन वर्षांनी त्याबाबत विचार करू.