अजित पवारांसह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या निर्णयाला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांच्या गटाकडून केला जात आहे. काही नेते दावा करत आहेत की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण आमदारांपैकी दोन तृतीयांश आमदार अजित पवारांबरोबर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, केवळ शपथ घेणारे नऊ आमदार गेले आहेत. बाकीचे अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत.
जयंत पाटील यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी काही वेळापूर्वी विचारलं की, तुमच्याकडे किती आमदार आहेत, त्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आमचा आहे. सगळेच ५३ आमदार आमच्याकडं होते. त्यातील ९ जणांनी शपथ घेतली, ते आता गेलेलेच आहेत. त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. ५३ पैकी ९ सोडून बाकीचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत. त्यामुळे आमदारांना संकटात टाकू नये. त्यांना प्रलोभने दाखवून दबाव टाकू नये. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांना काम करून द्यावं.
हे ही वाचा >> “शपथविधीला शरद पवारांची संमती…”, राष्ट्रवादीच्या आमदाराचं वक्तव्य; म्हणाले, “तो निर्णय घेताना ज्येष्ठ नेत्यांना…”
दरम्यान, अजित पवारांबरोबर किती आमदार आहेत असा प्रश्न मंत्री छगन भुजबळ यांना विचारल्यावर ते म्हणाले, आमच्याबरोबर खूप खूप खूप आमदार आहेत. आम्ही सत्तेत सहभागी झाल्याने आता लोकांची कामं होत आहेत. विकासकामं होतं आहेत. दरम्यान, खातेवाटप कधी होईल, असा प्रश्न विचारल्यावर छगन भुजबळ म्हणाले, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील. मंत्री छगन भुजबळ टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.