राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यापासून राज्यभरातले ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे भुजबळ यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. राज्य सरकारविरोधात भूमिका असतील तर भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका घेतल्याने महायुतीतले काही नेते भुजबळांविरोधात आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांवर शेलक्या शब्दांत टीका केली. संजय गायकवाड म्हणाले, “भुजबळांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळाबाहेर काढलं पाहिजे.” या टीकेनंतर छगन भुजबळ यांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला.
अहमदनगर येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मी अडीच महिन्यांपूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आंबड येथे १७ नोव्हेंबर रोजी ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली. त्या रॅलीच्या एक दिवस आधी, म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मी आधी राजीनामा दिला आणि मगच आंबडच्या सभेसाठी रवाना झालो. त्यामुळे मला लाथा घालायची गरज नाही.
दरम्यान, भुजबळ यांनी राजीनामा राज्यपालांकडे का दिला नाही? त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी का स्वीकारला नाही? राजीनाम्यानंतर कॅबिनेटमध्ये काय घडलं? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नांना छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मी १७ नोव्हेंबर रोजी आंबडच्या ओबीसी एल्गार सभेला जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या नावाने माझा राजीनामा लिहून तो अजित पवारांच्या कार्यालयाला पाठवून दिला होता. सभेला जाताना या राजीनाम्याची कुठेही वाच्यता करू नका असा निरोप मला पाठवण्यात आला. त्यामुळे मी सभेत राजीनाम्याची वाच्यता केली नाही. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी (अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस) मला बोलावून घेतलं. त्यावेळी अजित पवार मला म्हणाले, मी तुमचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, तिन्ही नेते मला म्हणाले की, तुमचं काम आणि ओबीसींबाबत मत मांडायला आमचा विरोध नाही. आपण शांततेत ओबीसींचं काम करायला पाहिजे. राजीनाम्याची वाच्यता करू नका. त्यानंतर अडीच महिने मी राजीनाम्याची वाच्यता केली नाही. त्यानंतर एक जण बोलला की, भुजबळच्या कमरेत लाथ घाला आणि त्याला मंत्रिमंडळाबाहेर बाहेर काढा. त्या वक्तव्यानंतर मी राजीनाम्याची वाच्यता केली.
…तोवर मला काम करत राहावं लागेल : भुजबळ
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणाले, मी मंत्रिपदाला चिकटून बसलो आहे असं कोणालाही वाटायला नको. एखाद्याला ते नाटक वगैरे वाटत असेल तर वाटू देत, त्यांना बोलू द्या. मी राजीनामा दिला आहे. माझा राजीनामा मंजूर होत नाही तोवर मला काम करत राहावं लागेल. फाईल्स आणि कागदपत्रांवर सह्या कराव्या लागतील.
हे ही वाचा >> “माझ्या नॅपकिनमध्ये जादू आहे, ती…”, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला भरत गोगावलेंचं उत्तर
दरम्यान, यावेळी भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही राज्यपालांकडे राजीनामा का दिला नाही? त्यावर छगन भुजबळ म्हणाले, आम्हाला मंत्री कोण करतं? आमची नावं राज्यपालांना कोण कळवतो? मुख्यमंत्री कळवतात. आम्हाला कोणती खाती द्यायची हे कोण ठरवतं? त्या खात्यांबाबतची माहितीदेखील मुख्यमंत्रीच कळवतात. मंत्रिमंडळातून कोणाला काढायचं, कोणाला घ्यायचं हेदेखील मुख्यमंत्री ठरवतात आणि राज्यपालांना कळवतात.