मराठा समाजाने आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चानंतर राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या अनेक मागण्या मान्य करत अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजातील लोकांना कुणबी जातप्रमाणपत्र दिलं जाणार आहे. तसेच कुणबी प्रमाणपत्र असणाऱ्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही हे प्रमाणपत्र दिलं जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. याविरोधात राज्यभरातले ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. अशातच ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अहमदनगर येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी राज्य सरकारविरोधात दंड थोपटले.
छगन भुजबळ यांनी यावेळी ओबीसींवरील अन्यायाच्या काही कथित बातम्या वाचून दाखवल्या. भुजबळ म्हणाले, “श्रीगोंद्यात ओबीसी एल्गार सभेची पूर्वतयारी सुरू असताना तिथे पोलीस पाठवण्यात आले आणि काम थांबवण्यात आलं. पोलिसांकरवी ओबीसी समाजात दहशत निर्माण केली जात आहे. त्यांना नोटीसा दिल्या. नोटीस देण्याच्या नावाखाली लोकांच्या सह्या घेतल्या. हे सगळं नेमकं काय चाललंय?” भुजबळ यांनी यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला. भुजबळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेब, हे सगळं काय चाललंय. तुमच्या गृह विभागाला सांगा, तुमच्या गृह विभागाकडून असा भेदभाव होता कामा नये. जे काही नियमाने असेल ते सगळ्यांनी करावं. आम्हाला एक न्याय आणि त्यांना रात्री ३ वाजता सभेची परवानगी कशी मिळते?
छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजातील लोकांची सभा रात्री दोन वाजता होते, त्यांना परवानगी कशी काय दिली जाते. त्यांच्यावर कारवाई का होत नाही. कुठलेही पोलीस त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत? त्यामुळे आता सगळ्यांनी एकत्र येऊन याविरोधात लढावं लागेल. दलित आणि आदिवासींनीही एकत्र यावं लागेल. माझं दलित आणि आदिवासी नेत्यांना एकच सांगणं आहे की, आज आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात. परंतु, अशा प्रकारचे निर्णय होतात, अधिसूचना काढली जाते, त्यातून संभ्रम निर्माण करून हळूहळू तिकडेही हेच होईल. एखादा मोठा मोर्चा आला तर तिकडेही हेच होईल. त्यामुळे काळजी घ्या