येवला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तसेच प्रदीर्घ काळ सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा सांभाळणारे छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेत पाच वर्षांत तिपटीने वाढ होऊन ती आता जवळपास २२ कोटींच्या घरात पोहोचली आहे. मागील विधानसभा निवडणुकीवेळी भुजबळ पती-पत्नीची मालमत्ता सुमारे आठ कोटी होती.
नांदगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात उतरलेले भुजबळ यांचे पुत्र पंकजही जणू वडिलांच्या मालमत्तेशी स्पर्धा करीत असल्याचे दिसते. कारण त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता २१ कोटींच्या घरात आहे.
येवला मतदारसंघात शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना छगन भुजबळ यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब समोर आली आहे. २००९ मधील विधानसभा निवडणुकीवेळी भुजबळ पती-पत्नींकडे चल व अचल अशी एकूण सात कोटी ७५ लाख २९ हजार २३ रुपयांची मालमत्ता होती. त्यात छगन भुजबळ यांच्याकडे तीन कोटी ६६ लाख ३९ हजार २१७, तर त्यांच्या पत्नीकडे चार कोटी आठ लाख ८९ हजार ८०६ रुपयांच्या मालमत्तेचा समावेश होता. पाच वर्षांत मालमत्तेची एकूण आकडेवारी २१ कोटी ९१ लाख रुपयांच्या घरात गेली आहे. भुजबळ कुटुंबीयांकडे १ कोटी ६४ लाख ६१ हजार ४४४ रुपयांची चल संपत्ती आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी त्याचे सविस्तर विवरण दिले होते; परंतु विधानसभेसाठी अर्ज भरताना तसा तपशील दिला गेला नाही. या कुटुंबीयांच्या अचल मालमत्तेची यादी बरीच मोठी आहे. दिंडोरी तालुक्यातील इंदोरे शिवारात १५ एकर शेतजमीन, नाशिक शहरात १.३० एकर जमीन व दोन भूखंड, मुंबई येथे ९६०, ५२३ व ११५० चौरस फूट क्षेत्राच्या तीन सदनिका, वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती व माझगाव येथे प्रत्येकी एक दुकान, नवी मुंबई येथे बंगला आदींचा समावेश आहे.
एकूण स्थावर मालमत्तेतील आठ कोटी ६१ लाख ८९ हजारांची मालमत्ता खुद्द भुजबळांच्या नावे असून त्यांच्या पत्नीच्या नावे असणाऱ्या मालमत्तेची किंमत ११ कोटी ६४ लाख ७८ हजार ५१० आहे. चल व अचल संपत्ती मिळून भुजबळ यांच्याकडे ९ कोटी २३ लाख १५ हजार १८२, तर पत्नीकडे १२ कोटी ६८ लाख १४ हजार २३३ रुपयांची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
भुजबळ पुत्रही कोटय़वधींचे धनी
नांदगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पंकज भुजबळ यांच्या कुटुंबीयांची एकूण मालमत्ता सुमारे २१ कोटींच्या घरात असून त्यांच्यावर सुमारे तीन कोटी रुपयांचे कर्जही आहे. उमेदवारी अर्ज भरताना छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब पुढे आली आहे. पंकज भुजबळ पती-पत्नीकडे चल व अचल अशी एकूण २० कोटी ४९ लाख सहा हजार २५१ रुपयांची मालमत्ता आहे. त्यात पंकज यांच्याकडे १४ कोटी ७९ लाख ४० हजार ४६७, तर पत्नी विशाखा यांच्या नावावरील पाच कोटी ६९ लाख ६५ हजार ७८४ रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे.
या कुटुंबीयांकडे सुमारे आठ लाख रुपये रोख, बँक खात्यामध्ये १५ लाखांहून अधिकची रक्कम, सव्वा कोटीहून अधिकची विविध रोख्यांत गुंतवणूक, ५७ लाख रुपये किमतीचे २१०० ग्रॅम सोने, तर सुमारे ४ लाख रुपये किमतीचे ९८५० ग्रॅम चांदीचे दागिने आदींचा समावेश आहे. या कुटुंबाची अचल मालमत्तेची यादी बरीच मोठी आहे. त्यात दिंडोरी तालुक्यातील इंदोरे शिवार, पुणे जिल्ह्यातील आटवण व देवघर येथे ४४ एकरहून अधिक जमीन, नाशिक शहरातील जमिनीत हिस्सा, सिडको येथे भूखंड, पुण्यातील देवघर येथे भूखंड, नवी मुंबईत सुमारे दोन हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका, दादर येथे सदनिका व कारखान्यातील काही यंत्रसामग्रीचा समावेश आहे. कोटय़वधींची मालमत्ता बाळगणाऱ्या पंकज भुजबळ कुटुंबीयांवर दोन कोटी ६९ लाखांचे कर्ज आहे.
भुजबळ पिता-पुत्रांची मालमत्तेत स्पर्धा
येवला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तसेच प्रदीर्घ काळ सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा सांभाळणारे छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेत पाच वर्षांत तिपटीने वाढ होऊन ती आता जवळपास २२ कोटींच्या घरात पोहोचली आहे. मागील विधानसभा निवडणुकीवेळी भुजबळ पती-पत्नीची मालमत्ता सुमारे आठ …
आणखी वाचा
First published on: 29-09-2014 at 05:04 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal assets