आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नुकतेच तुरूंगातून जामिनीवार बाहेर आलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे. मंत्री छगन भुजबळ तुरूंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्लॅकमेल करायचे, असं विधान रमेश कदम यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ते पंढरपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रमेश कदम म्हणाले, “तुरुंगात असताना छगन भुजबळ रोज आजारी पडायचे. त्यांना रोजच उपचाराची गरज होती. पण, आता भुजबळ एकदम तंदरूस्त आहेत. त्यांच्या छातीत दुखतंय, पाय सुजलाय, खांद्याचा त्रास होतो, हे आता आम्ही ऐकलं नाही.”
हेही वाचा : उदयनराजे भोसले कॉलर उडवतात, डान्स करतात, ही भाजपाची शिस्त आहे का? केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारताच…
“तुरूंग हे कोणाच्याही नशिबात येऊ नये. तुरूंग नर्क आहे. तुरूंगात गेल्यावर आठ दिवसांत लोक आजारी पडतात, छातीत दुखतं आणि बरंच काही होतं. पण, ही कारणं सांगून नेते, लोक आणि पक्षाची सहानभुती घेत जामीन मिळवतात. तेव्हा छगन भुजबळांनीही हेच केलं,” असं रमेश कदम यांनी म्हटलं.
“जामिनासाठी उशीर होत असल्यानं शरद पवारांनी मदत केली पाहिजे, अशी नाराजी छगन भुजबळ बोलून दाखवायचे. माझा जामीन झाला नाहीतर, वेगळा मार्ग स्विकारावा लागेल, अशा पद्धतीनं भुजबळांनी शरद पवारांना ब्लॅकमेलिंग केल्याचं आम्ही पाहिलं आहे,” असं रमेश कदम यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा : मध्यरात्री २ वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई, दोन नेत्यांवर आरोप करत म्हणाले…
दरम्यान, अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी रमेश कदम तुरूंगात होते. अलीकडंच त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. दोन दिवसांपूर्वी मोहोळ मतदारसंघात रमेश कदम यांचं समर्थकांनी जंगी स्वागत केलं होतं. कदम अद्यापही आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नाही.