मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील ऑगस्ट महिन्यात उपोषणाला बसले होते. परंतु, ३१ ऑगस्टच्या रात्री या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या लाठीहल्ल्यात शेकडो मराठा आंदोलक जखमी झाले होते. महिला, लहान मुलांसह वयोवृद्ध आंदोलकांवरही पोलिसांनी लाठीहल्ला केला. मराठा आंदोलकांवर झालेल्या या लाठीहल्ल्याचे राज्यभर तीव्र पडसाद उपटले होते. दरम्यान, या लाठीहल्ल्याबाबत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी वेगळा दावा केला आहे. मराठा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, यात ७० पोलीस जखमी झाले त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते ओबीसींच्या एल्गार सभेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर महाराष्ट्रातील ज्या-ज्या मराठा कुटुंबांच्या मागील दोन-तीन पिढ्यांमधल्या कुणबी नोंदी आहेत त्या कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक मराठा कुटुंबांचा कुणबी जातप्रमाणपत्रासह ओबीसी आरक्षणात समावेश होणार आहे. परंतु, राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी, प्रामुख्याने छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांनी त्यास विरोध केला आहे. मनोज जरांगे पाटील यांना आव्हान देण्यासाठी छगन भुजबळ यांच्यासह राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी जालन्यातल्या आंबड येथे ओबीसी एल्गार मोर्चा काढला. या मोर्चानंतर आयोजित ओबीसी एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आंदोलकांवर गंभीर आरोप केले आहेत.

छगन भुजबळ म्हणाले, लाठीचार्जच्या दिवशी नेमकं काय झालं ते मी आज संपूर्ण महाराष्ट्राला सांगणार आहे. खरंतर पोलिसांचा लाठीचार्ज सगळ्यांनी पाहिला, परंतु, ७० पोलीस जखमी झाले त्याबाबत कोण बोलणार? महिला पोलिसांसह ७० पोलिसांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. हे पोलीस दगडाचा मार खाऊन जखमी झाले होते.

हे ही वाचा >> शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिलं आणि इतरांचं नुकसान केलं? भर सभेत छगन भुजबळ म्हणाले…

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, त्या दिवशी काय झालं ते मी सांगतो. पोलीस याला (मनोज जरांगे पाटील) उठवायला गेले होते. तर हे पोलिसांना म्हणाले, मी झोपलोय, तुम्ही नंतर या. त्यानंतर पोलीस तिथून गेले. मग यांनी (आंदोलकांनी) सगळी तयारी यांनी करून ठेवली. यांच्याबरोबर खूप महिलादेखील होत्या. त्यामुळे त्यांना समज देण्यासाठी महिला पोलिसांना आणलं होतं. मग पोलिसांनी विनंती केली की तुमची प्रकृती खालावली आहे आता तुम्ही रुग्णालयात गेलं पाहिजे. परंतु, त्याचवेळी पोलिसांवर दगडांचा मारा सुरू झाला. पटापट पोलीस जमिनीवर पडले. ते ७० पोलीस पाय घसरून पडले का? ७० पोलिसांना रुग्णालयात दाखल केल्याची नोंद आहे. त्यांना कोणी मारलं? एवढंच नाही, तुम्ही महिला पोलिसांनादेखील मारलं. तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या सुनेलाही आई म्हणून परत पाठवलं होतं आणि तुम्ही आमच्या महिला पोलिसांना… तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली का? हे सगळं झाल्यावर पोलिसांनी मग लाठीचार्ज केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal claims manoj jarange patil and maratha protesters threw stones police women asc