मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत जात आहे. त्यात ओबीसी समाजाने कुणबी प्रमाणपत्रासाठी विरोध दर्शवल्याने मराठा आरक्षणातील समस्या अधिक वाढल्या आहेत. तसंच, आता थेट ओबीसी विरुद्ध मराठा असा राजकीय संघर्ष सुरू झाल्याने समाजात तेढ निर्माण होत असल्याचीही चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना तीन भागावर लक्ष देणं गरजेचं आहे. पहिला भाग म्हणजे आमच्यावर आरोप होत होते की ओबीसीचे वेगवगेळे घटक असेच घुसलेले आहेत, त्यामध्ये आयोग नाही वगैरे. पण, यशवंतराव चव्हाण, मंडल कमिशन, व्ही. पी. सिंग, त्याची अंमलबजावणी आणि मग ९ न्यायमूर्तींच्या शिक्क्यानिशी हे आरक्षण मिळालं. दुसरा भाग म्हणजे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. ती भूमिका आमची पहिल्यापासून आहे. विधानसभेत कायदे पारीत करण्यासाठी आम्ही पाठिंबा दिला होता. त्यामध्ये त्रुटी राहिल्या असतील तर त्यावर दुरुस्ती करण्याचं काम सरकार करतंय. पण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम योग्य नाही. त्यामुळे अन्याय होईल. सर्वच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेऊन आले तर आरक्षण द्यायचं कोणाला?” असा सवालही उपस्थित केला.
हेही वाचा >> “माझी भूमिका घेऊन मी निघालो, पक्षाचा मला…”, छगन भुजबळांच्या ओबीसी समर्थनाला पक्षाचा पाठिंबा?
“तिसरा भाग आहे तो स्वतःबद्दल आहे. एक तर गेल्या दोन महिन्यांत जरांगेंच्या १४ सभा झाल्या. त्यामध्ये पहिल्या सभेपासून माझ्यावर आरोप झाले. माझ्याविरोधात वाट्टेल ते बोलत होते. मी शांतच होतो. बीडमध्ये प्रचंड प्रमाणावर आमदारांवर घरे, हॉटेल्स जाळल्यानंतर मी बोललो. आधी ते म्हणाले की ही माणसं आमची नाहीत, तर दुसऱ्या दिवशी लगेच म्हणाले की त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका, त्यांना सोडून द्या. याचा अर्थ काय? त्यामुळे मला त्यावर भाष्य करावं वाटलं. तुम्ही माझ्यावर वैयक्तिक टीका करता. मी तुमच्या उपोषणावर टीका केली नव्हती. पण भुजबळांचं नाव घेऊन शिव्या का घालत होते. अश्लील भाषेत लोकांना शिव्या का घालत होतात? तरीही मी गप्प राहिलो. जाळपोळ झाली तेव्हा मी बोललो. कोणताही संमजस्य माणूस गप्प राहणार नाही. मी माझ्या पद्धतीने विरोध केला”, असंही ते म्हणाले.
“जे आधीच कुणबी आहेत, त्यांना माझा विरोध नाही. नाशिकमध्ये सर्वाधिक कुणबी सापडले होते. त्यांच्याविरोधात मी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार नाही. उलट त्यांचं संरक्षण करतोय की सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर सर्वांवर अन्याय होईल”, असं ते म्हणाले.
“जाळपोळ कोणी केली, गावबंदीचे बोर्ड कोणी लावले, १४ सभा घेऊन कोणी टीका केली, पण तेव्हा वाटलं नाही का दोन समाजात वितुष्ट येतंय. मी फक्त त्याला आवाज फोडण्याचं काम केलंय. दोन महिने आम्ही शिवीगाळ, धमक्या ऐकतोय. पोलिसांत तक्रारीही केल्या. त्यापुढेही जाऊन आमदारांच्या घरांवर जाळपोळ झाली. त्यामुळे मला बोलावं लागलं”, असं छगन भुजबळ म्हणाले.