राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधिमंडळ अधिवेशनात मुंबई ‘सोन्याचं अंड देणारी कोंबडी’ असं वक्तव्य केल्याने जोरदार गदारोळ झाला. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्यस्थी केली. आता स्वतः छगन भुजबळ यांनी अधिवेशनात काय झालं आणि त्यांच्या वक्तव्यामागे त्यांची काय भूमिका होती यावर स्पष्टीकरण दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छगन भुजबळ म्हणाले, “विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, पण काहीच बोलता येत नाही. काही बोललं तर त्यातील कोणताही मुद्दा काढून आक्षेप घेतला जातो. मी काल म्हटलं की, मुंबई हे सुरू आहे, ते सुरू आहे आणि मुंबई शहर सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. हे मी अनेक वर्षांपासून बोलत आलो आहे. हा एक वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ लोकांना खूप पैसे मिळतात.”

“भाजपावाल्यांनी मुंबईला कोंबडी म्हटल्याचा मुद्दा उपस्थित केला”

“मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मी म्हटलं की, सोन्याचे अंडे आहेत ते खा, मात्र कोंबडी कापून खाऊ नका. मुंबई शहराला वाचवा. यानंतर भाजपावाल्यांनी मुंबईला कोंबडी म्हटल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे किती विद्वान लोक आहेत. यांची गोष्टच वेगळी आहे,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

“विरोधकांना दडपण्यासाठी जयंत पाटलांचं निलंबन”

छगन भुजबळ पुढे म्हणाले, “मुंबई सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे यावरून वाद झाल्यावर अजित पवार म्हणाले की आम्ही हे विधान मागे घेतो. आजही तेच झालं. या सरकारची चुकीची कामं लोकांसमोर येत आहेत. त्यामुळे विरोधीपक्षाला दडपण्यासाठी, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी आज जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं.”

“भूखंड घोटाळ्यावरून लक्ष हटवण्यासाठी दिशा प्रकरण काढलं”

“भूखंड घोटाळ्यावरून गडबड सुरू आहे. आता ते प्रकरण बाहेर आलंय. त्यामुळे त्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी दिशा सालियनचं प्रकरण काढण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं आत्महत्या आहे आणि दिशाच्या घरच्यांनीही हे राजकारण थांबवा आणि आमच्या मुलीची अब्रू चव्हाट्यावर काढू नका म्हणून सांगितलं. त्यानंतरही भाजपावाले वारंवार आज हा मुद्दा उपस्थित करत आहेत,” असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “निदान आमदारांची गाडी तरी सोडा ना ओ”, छगन भुजबळांकडून अधिवेशनात तीव्र नाराजी, म्हणाले…

“त्यांचे १० लोकं बोलले, आमच्या दोघांनाही बोलू दिलं नाही”

भुजबळ म्हणाले, “दिशा सालियन प्रकरणात भाजपावाले ज्या नेत्याकडे इशारा करत आहेत त्या पक्षाच्या नेत्याला बोलण्याची संधी द्यावी अशी आम्ही अधिवेशनात मागणी केली. मात्र, त्यांना बोलण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यांचे १० लोकं बोलले, आमच्या किमान दोघांना तरी बोलू द्यायला हवं. त्यावरून गदारोळ झाला.”

हेही वाचा : “…तेव्हा आम्ही शरद पवारांच्या शिव्या खाल्ल्या होत्या”, जितेंद्र आव्हाडांनी सांगितली ‘ती’ घटना

“तुम्ही निर्लज्ज आहात असं म्हटलं नाही, तर…”

“यावर जयंत पाटलांनी ते वाईट आहेत असं म्हटलं नाही. त्यांनी वाईट वागू नका असं म्हटलं. दोघांमध्ये फरक आहे. तुम्ही निर्लज्ज आहात असं म्हटलं नाही, तर तुम्ही निर्लज्जपणे वागू नका असं म्हटलं. त्यावर तुम्ही निर्लज्ज कसे म्हटला असा आक्षेप घेण्यात आला. यावरून जयंत पाटलांचं निलंबन करण्यात आलं,” असंही भुजबळांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal comment on controversial statement on mumbai in assembly session rno news pbs
Show comments