माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या अधिवेशनात पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “निदान आमदारांची गाडी तरी सोडा ना ओ”, असं म्हणत छगन भुजबळांनी झालेला त्रास सांगितला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भुजबळ यांना आश्वासित केलं.
छगन भुजबळ म्हणाले, “रिझर्व्ह बँकेच्या जवळील रस्ता बंद करण्यात आला आहे. तेथे आम्हाला दुसरीकडून या असं सांगतात. त्यामुळे अर्धा तास वाहतूक कोंडीतून विधिमंडळात यावं लागतं. जागोजागी अडवणूक होत आहे. आमदारांना तिथून यायचं आहे, निदान आमदारांची गाडी तरी सोडा ना ओ.”
“सीमावादावर अधिवेशनात ठराव मांडून एकमताने मंजुर करा”
यावेळी भुजबळांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर एक ठराव मांडून तो एकमताने मंजुर करण्याचीही मागणी केली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बेळगाव-कारवारविषयी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आता त्यांचं म्हणणं सभागृहाचं म्हणणं आहे हे सांगण्यासाठी त्यांनी या अधिवेशनात त्यावर एक ठराव मांडावा आणि सगळ्यांनी तो एकमताने मंजुर करावा.”
हेही वाचा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलताना भुजबळांनी करुन दिली बाळासाहेबांची आठवण; म्हणाले, “ते शेवटपर्यंत…”
भुजबळांना नार्वेकरांचं आश्वासन
भुजबळांनी अधिवेशनातच आमदारांच्या गाड्या अडवल्या जात असल्याची तक्रार केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भुजबळ यांना या प्रकरणी वाहतूक पोलिसांना सूचना केल्या जातील असं आश्वासन दिलं.