विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. अधिवेशनच्या सुरुवातीला अध्यपदाची निवडणूक घेण्यात आली. भाजपाचे राहुल नार्वेकर यांना बहुमतापेक्षा अधिक मते मिळाल्यामुळे त्यांची विधानसभा अध्यपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोबाईलवरील एक मेसेज वाचून दाखवत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला लगावला. या टोलेबाजीनंतर सभागृहात एकच हशा पिकला.
“अमित शाहांचा एक डाव आणि”
“जगातील सर्व खेळाडूंचा पराभव करणारे भारतीय बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांना गृहमंत्री अमित शहांसोबत बुद्धीबळाचा डाव खेळणार का असं विचारलं, तर त्यांनी नकार दिला. कारण अमित शाहा एकच डाव टाकतात आणि कोणत्या सोंकट्या कुठं जातात सांगता येत नाही. त्यामुळे विश्वनाथन आनंद अमित शाहांसोबत बुद्धीबळ खेळत नाही”, असं म्हणत भुजबळांनी शाहांना टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्यानंतर बाळासाहेब थोरात मनोगत व्यक्त करण्यासाठी उठत होते. मात्र, छगन भुजबळांना राहवलं नाही आणि त्यांनी मध्येच उभारत मोबाईलमधील मेसेज वाचून दाखवला. त्यानंतर काही वेळ सभागृहात हशा पिकला.