देशात आरक्षणाच्या नावाखाली गाजरं दाखवून जनतेची फसवणूक केली जाते असा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला. तुम्ही चहा विकत होतात ते ठीक होतं मात्र देश विकू नका असाही टोलाही भुजबळ यांनी लगावला. निफाड येथील सायखेडाच्या जाहीर सभेत छगन भुजबळ बोलत होते. या सरकारने आश्वासने देऊन सत्ता मिळवली मात्र आश्वासनांचे काय झाले? असाही प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
या सरकारला जनहिताबाबत जे प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरं मोडतोड करुन फिरवली जातात. कांद्याचे दर पडले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने कांद्याचे फुकट वाटप केले. त्यावेळी कांदा मुख्यमंत्र्यांना कुरिअरनेही पाठवण्यात आला. मात्र सरकारला काहीही फरक पडलेला नाही. फुकट आहे म्हणून त्यांनी तो ठेवून घेतला असाही टोला भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. आघाडी सरकारच्या काळात ३५० रुपये अनुदान दिले होते. ते आत्ताच्या काळात फक्त २०० रुपये दिले. कांद्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही असाही आरोप भुजबळ यांनी केला.
याच सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. या सरकारला जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नाहीत. या सरकारला फक्त दिशाभूल करणं चांगलं जमतं असं म्हणत अजित पवारांनी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला.