मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत आरक्षण देणारे विधेयक आज (२० फेब्रुवारी) राज्य विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य सरकारने एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावले होते. दरम्यान, या अधिवेशनात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. जरांगे पाटील हे धमक्या देतात. त्यांनी मलादेखील धमकी दिली. त्यांना लगाम घालणार आहात की नाही, असा सवाल भुजबळ यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छगन भुजबळ काय म्हणाले?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंचा उल्लेख केला. जरांगे सतत धमक्या देत आहेत. याला टपकावीन, त्याला टपकावीन असे ते म्हणत आहेत. मलादेखील त्यांनी धमक्या दिल्या. हे काय चालू आहे. एवढंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना ते शिव्या देत आहेत. आम्हाला तर ते नेहमीच शिव्या देतात. तिथे बसलेल्या महसूल आयुक्त, एसपी, जिल्हाधिकारी यांनाही आईवरून शिव्या दिल्या जात आहेत. ही दादागिरी चाललेली आहे. त्याला लगाम घालणार आहात की नाही,” असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

सरकारने योग्य ती उपायजोना करावी- नार्वेकर

भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केले. भुजबळ यांनी त्यांच्या स्वत:च्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. त्याची सरकारने योग्य ती दखल घ्यावी, असे निर्देश नार्वेकर यांनी दिले. “छगन भुजबळ यांनी त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. त्याची सभागृहाने नोंद घेतलेली आहे. भुजबळ यांना कोणत्याही प्रकारे जीवितहानीची शक्यता वाटत असेल तर त्यांनी ही चिंता व्यक्त करणे रास्त आहे. सभागृहाने याची नोंद घेतली आहे. सरकारने याची गंभीर दखल घेऊन योग्य ती उपायोजना करावी,” असे नार्वेकर यांनी सांगितले.

मनोज जरांगेंनी व्यक्त केली शंका

दरम्यान, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले असले तरी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हे आरक्षण टिकेल का याबाबत शंका आहे. हे आरक्षण अवघ्या १०० ते १५० लोकांसाठी आहे. आमच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. तसेच सरकारने सगेसोयऱ्यांबाबतची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. आम्हाला आमचे हक्काचे ओबीसी आरक्षण मिळायला हवे, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. तसेच त्यांनी २१ फेब्रुवारी रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal criticizes manoj jarange over intimidating obc leaders chief minister and government official prd