एका महिला पत्रकारने प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी ‘कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो’ असे वादग्रस्त विधान केले. भिडे यांच्या या विधानानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. भिडे यांच्या या विधानाची दखल थेट राज्य महिला आयोगाने घेतली. महिला आयोगाकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी, काँग्रेससारख्या पक्षांनी भिडे यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर भाष्य केले आहे. सावित्रीबाई फुले कपाळावर मोठे कुंकू लावायच्या. मग त्यांच्यावर शेण, चिखल का फेकण्यात आला? असा सवाल त्यांनी केले. ते शिर्डीत राष्ट्रवादीच्या अधिवेशनात बोलत होते.
हेही वाचा >>>> मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली! ‘जागर मुंबई’च्या माध्यमातून ठाकरे गटाला घेरणार; ‘वांद्रे पूर्व’ला पहिली सभा
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतात शेती करत होते. माध्यमांनी ते दाखवलं. मला वाटलं की मनोहर भिडे हे तुमच्या शेतामध्ये माझ्या अंब्याची झाडे लावा, असे सांगायला शिंदे यांच्याकडे गेले असतील. मात्र भिडे मुख्यमंत्र्यांना भेटून काय बोलले हे विचारावे लागेल. या (मनोहर भिडे यांचे कुंकू लाव विधान) लहान लहान गोष्टी नाहीयेत. या गोष्टी मुद्दाम घडवून आणल्या जातात. मला त्यांना विचारायचे आहे की, सावित्रीबीई फुले फार मोठं कुंकू लावायच्या. सावित्रीबाई यांच्या कपाळावर मोठे कुंकू होते. मग त्यांना का दगड मारले. त्यांच्यावर चिखलफेक का झाली. त्यांच्या कपाळावर मोठं कुंकू होतं ना?” असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
हेही वाचा >>>> “…तो हमने भी जख्म नही गिने” राजकारणाची लढाई मैदानात लढा म्हणत छगन भुजबळांची टोलेबाजी
संभाजी भिडे काय म्हणाले?
संभाजी भिडे ३ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, एका महिला पत्रकाराने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असता, “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही”, असे वादग्रस्त विधान केले होते. भिडे यांच्या या विधानानंतर राज्यातील महिला नेत्यांसह अनेकांनी निषेध व्यक्त केला.