आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळणार आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेचा शिंदे गटही १६ पेक्षा जास्त जागांवर अग्रही आहे. अशातच महायुतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला केवळ तीन ते चार जागाच दिल्या जातील अशी चर्चा आहे. दरम्यान, आम्हालाही शिंदे गटाइतक्याच जागा हव्या आहेत अशी मागणी अजित पवार गटाने केली आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी ही मागणी केली होती. तसेच भुजबळांनी ही मागणी लावून धरली आहे.
छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या जागांबाबतची त्यांची (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) मागणी पुढे केली आहे. भुजबळ म्हणाले, महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर ४० आमदार आहेत. आमचेदेखील ४० आमदार आहेत. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंबरोबर जे आमदार आणि खासदार आहेत ते मोदी लाटेत निवडून आले आहेत. मागील लोकसभा-विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती होती. त्यावेळी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट होती. त्या लाटेत किंवा त्यांच्या पाठिंब्याने हे आमदार-खासदार निवडून आले आहेत. आम्ही त्यावेळी त्यांच्याविरोधात लढलो होतो. त्यामुळे आमचं महत्त्व कमी लेखता कामा नये. म्हणूनच आम्हालाही शिंदे गटाइतक्याच जागा द्यायला हव्यात, अशी आमची अपेक्षा आहे.
हे ही वाचा >> “निवडणुकीनंतर आमचे विरोधक गाणं म्हणतील, “जिंदगी इम्तिहान लेती है..”, देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी
गेल्या चार-पाच दिवसांपासून समाजमाध्यमांवर महायुतीच्या जागावाटपाचे दोन फॉर्म्युले व्हायरल होत आहेत. महायुतीचे ३७-८-३ आणि ३४-१०-४ असे दोन कथित फॉर्म्युले चर्चेत आहेत. पहिल्या कथित फॉर्म्युलानुसार भाजपाला ३७, शिंदे गटाला ८ आणि अजित पवार गटाला केवळ ३ जागा मिळतील. तर, दुसऱ्या फॉर्म्युलानुसार भाजपाला ३४, शिंदे गटाला १० आणि अजित पवार गटाला ४ जागा दिल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर महायुतीतल्या कोणत्याही पक्षाने शिक्कामोर्तब केलेलं नाही. उलट, शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेत्यांनी हे फॉर्म्युले फेटाळून लावले आहेत. या फॉर्म्युलांबाबत प्रतिक्रिया विचारल्यावर छगन भुजबळ म्हणाले, ते तुमचे (प्रसारमाध्यमांचे) फॉर्म्युले आहेत. त्यावर मी काय बोलणार? तो आमचा फॉर्म्युला नाही. आम्ही एवढंच सागितलं आहे की, महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील तितक्या जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळायला हव्यात.