Maharashtra Cabinet Expantion : विधानसभा निवडणुकीनंतर ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दहा दिवसांनी आज देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून, राज्यपाल सीपी राधाकृष्णण नव्या मंत्र्यांना शपथ देत आहेत.
महायुती सराकरमध्ये राष्ट्रवादीच्या (अजित पवार) वाट्याला १० मंत्रिपदे आली आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देत छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. दरम्यान राष्ट्रवादी (अजित पवार) महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यामागचे कारण सांगितले आहे.
काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
आज नागपूर राजभवन परिसरात मंत्रिमंडळाच्या शपथविधिला सुरुवात होण्यापूर्वी काही मिनिटे आधी रुपाली चाकणकर यांना राष्ट्रावादीने (अजित पवार) छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटीली आणि धर्मरावबाब आत्राम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना संधी का नाही दिली असे विचारण्यात आले होते. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.
यावर बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “आपण कायम म्हणतो की, उद्याचे भवितव्य तरुणाईच्या हातामध्ये उगवत्या नेतृत्त्वाच्या हातामध्ये असते. यावेळी आमच्या ४१ आमदारांमध्ये अनेक नवे चेहरे आहेत. त्यांना मतदारांनी पसंती दिली आहे. त्यामुळे कोणाला थांबवले किंवा डावलले असा कोणताही प्रकार नाही. या वरिष्ठ नेत्यांनी स्वत:हून दादांकडे भावना व्यक्त केली असेल की, नव्या नेतृत्त्वाला संधी द्यावी.”
मंत्रिमंडळात चार महिला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात चार महिलांना स्थान मिळाले आहे. यातील तीन महिला मंत्री भाजपाच्या असतील. त्यामध्ये पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीने (अजित पवार) पुन्हा एकदा आदिती तटकरेंना संधी दिली आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) एकाही महिला आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.
हे ही वाचा : “…परंतु काही गोष्टी” अजित पवारांनी सांगितले आमदारांची संख्या न वाढण्यामागचे कारण
राष्ट्रवादीकडून कोण-कोण झाले मंत्री?
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस पक्षाने ४१ जागा जिंकल्या आहेत. त्यानुसार महायुतीतून त्यांच्या वाट्याला १० मंत्रिपदे आली आहेत. यापैकी अजित पवार यांनी यापूर्वीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर आज आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तामामा भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.