Chhagan Bhujbal praised Eknath Shinde and Devendra Fadnavis : सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे आज भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ वा जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या महायुती सरकारने मंत्रालयाच्या प्रेवशद्वारावर महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, “मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचाही पुतळा असावा असे अनेक वर्षांचे स्वप्न यांनी (शिंदे-फडणवीस) काही महिन्यांत पूर्ण केले.”
आमचे स्वप्न यांनी काही महिन्यांत पूर्ण केले…
यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी महायुती सरकारच्या कामांचे कौतुक केले. ते म्हणाले, “या सरकाने खूप कामे केली आहे. यातील पहिले काम मी तुम्हाला सांगणार आहे. मी विरोधी पक्षात असताना शिंदे आणि फडणवीस या दोघांचे सरकार होते. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा, जिजामाता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहे. तेथेच जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचाही पुतळा बसवावा अशी मागणी आम्ही केली होती. त्याच विधानसभेच्या अधिवेशनात शिंदे साहेब आणि त्यांनी (फडणवीस) सांगितले की, आम्ही जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचाही पुतळा बसवणार आहोत. तुम्हाला सांगतो अनेक वर्षांचे आमचे जे स्वप्न होते, ते यांनी काही महिन्यांत पूर्ण केले.”
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त नायगाव (सातारा) येथील त्यांच्या जन्मस्थळी आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, मंत्री शंभुराज देसाई आणि आमदार छगन भुजबळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
छगन भुजबळांची नाराजी
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने प्रचंड मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारातून राष्ट्रवादीने (अजित पवार) माजी मंत्री छगन भुजबळ यांना डावलले होते. यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली आहे. भुजबळांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. इतकेच नव्हे तर भुजबळ भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत.