राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्रीमंडळात अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं मिळालं आहे. यानंतर पहिली प्रतिक्रिया देत त्यांनी आनंद व्यक्त केला. महाविकासआघाडी सरकारच्या काळातही भुजबळांकडे हेच खातं होतं. त्याचा उल्लेख करत छगन भुजबळांनी त्यावेळी केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच आगामी काळातील कामाची दिशा स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छगन भुजबळ म्हणाले, “कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये सगळं बंद असताना ५४ हजार दुकानांच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात अन्नधान्य पुरवलं. सगळं बंद होतं, केवळ रेशन दुकानं आणि रुग्णालयं चालू होती. पोलीस, डॉक्टर आणि रेशन पुरवणारे सगळे कर्मचारी रात्रंदिवस काम करत होते. अनेक अडचणी येऊनही कुठे अन्नधान्य पोहचलं नाही, असं झालं नाही.”

“हे सगळ्यांचं पोट भरणारं खातं आहे”

“ठीक आहे, हे खातं चांगलं आहे. आपण गोरगरिबांसाठी शिवभोजनसारख्या योजना सुरू केल्या. तांदूळ मोफत आणि दुप्पट द्यायला लागलो. आताही दिवाळीला गोरगरिबांना गोडधोड करता यावं म्हणून अनेक योजना आखता येतील. मला आनंद आहे की, हे सगळ्यांचं पोट भरणारं खातं आहे. शेतीत जे अन्नधान्य तयार होतं ते घराघरात पोहचवण्यासाठी या खात्याचा उपयोग होतो याचा मला आनंद आहे,” अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : महाराष्ट्र सरकारचं खातेवाटप जाहीर! अजित पवारांकडे अर्थ खातं, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती

अर्थखातं अजित पवारांकडे कृषी खातं सत्तारांकडून धनंजय मुंडेंकडे, छगन भुजबळ म्हणाले…

अर्थखातं अजित पवारांकडे कृषी खातं सत्तारांकडून धनंजय मुंडेंकडे गेल्याबाबत विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “अर्थखातं अजित पवारांकडे आहे ही चांगली गोष्ट आहे. अजित पवारांनीही आम्ही सर्वांना न्याय देणार असं सांगितलं आहे. उपमुख्यमंत्री किंवा मंत्री झाल्यावर ते कुठल्याही एका घटकाचे नसतात, ते सगळ्या राज्याचे, सर्व लोकांचे आणि सर्व पक्षांचे असतात. ते त्यात भेदभाव करणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णपणे सहकार्य मिळेल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal first reaction on portfolio distribution of shinde fadnavis pawar government pbs
Show comments