मनोज जरांगे यांच्या मातोरी गावात काल रात्री (२७ जून) दगडफेक झाली. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके मातोरी गावात आलेले असताना हा प्रकार घडला. मराठा समाज आणि ओबीसी नेते यावेळी आमने सामने आले असल्याचं म्हटलं जातंय. यावरून मनोज जरांगे पाटलांनी आता छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे. छगन भुजबळांना दगडफेक करण्याचा नाद असल्याचं ते म्हणाले आहेत. टीव्ही ९ ने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले, “दगडफेक झाल्याची माहिती मला मिळाली आहे. हा प्रकार घडवून आणला आहे, अशी मला त्यात शंका दिसतेय. छगन भुजबळांना दगडफेक करण्याचा नाद आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतो आहे. परंतु, छगन भुजबळांना माझंच गाव का सापडलं? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
हेही वाचा >> लक्ष्मण हाकेंचा ताफा मनोज जरांगेंच्या गावात पोहोचताच दगडफेक, दोन गट आमने-सामने; गावात तणावपूर्ण शांतता!
“आंतरवाली सराटीतही माझ्या आंदोलनापुढे बसायला लावलं. सरकारपुरस्कृत ते आंदोलन होतं. हे सिद्धही झालं. छगन भुजबळांनी ते आंदोलन ठेवलं होतं. त्यांना सवय आहे. त्यांना हटकून करायची सवय आहे. मुद्दाम वाटा जायची (मुद्दाम वाट्याला जाण्याची) ही सवय आहे. आंदोलन करायला विरोध नाही. पण, दंगल झाली पाहिजे. जाती जाती तेढ निर्माण झाली पाहिजे, यासाठी त्यांनी आंदोलन केलं”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“पण इथं मी होतो स्वतः, त्याच्यामुळे मी ओबीसी आणि मराठ्यात वाद होऊ देणार नाही. मला शक्यता दिसतेय, माझ्या गावी जाऊन असे प्रकार करायचे. आंतरावली सराटीत मी गाड्या फोडू दिल्या नाहीत, त्यामुळे माझ्या गावी जाऊन त्यांनी असं केलं. छगन भुजबळांनी सांगितलं की गाड्या फोडा आणि आरोप गोरगरिबांवर टाका. माझ्या बीड जिल्ह्यातील मराठ्यांना त्रास होता कामा नये. मी जाहीरपणाने सांगतो की छगन भुजबळाच्या नादी लागून तुम्ही तिथं जाऊन गाड्या फोडून घेणार, छगन भुजबळ सत्तेत आहेत त्यामुळे ते माझ्या गावावर आरोप करतील. मला बदनामकरण्यासाठी हा प्रकार आहे असं असू शकतं. पालकमंत्र्यांनी यावर लक्ष दिलं पाहिजे”, असंही ते म्हणाले.
मातोरीत दगडफेक
लक्ष्मण हाके यांचा ताफा मनोज जरांगे पाटलांच्या गावी म्हणजेच मातोरीत आला असताना बसस्टॅण्डवर दगडफेक करण्यात आली. यावेळी अनेक गाड्यांचं नुकसान झालं. परिणामी गावात तणावपूर्ण शांतता होती. त्यामुळे पोलिसांनी येथे पथके तैनात केली आहेत. तर, जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडू देऊ नका, असं आवाहन बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.