सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर संपूर्ण राज्यात रान पेटविणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी सोलापुरात जंगी मेळावा झाला. यावेळी त्यांनी राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत, भुजबळसाहेब, आम्हांला डिवचू नका , अशा शब्दात संताप व्यक्त केला.
हुतात्मा स्मृतिमंदिरात सकल मराठा समाजाच्या झेंड्याखाली आयोजिलेल्या या सभेस हजारापेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित होता. तत्पूर्वी, जरांगे-पाटील यांचे शहरात आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी मराठा समाज लोटला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकनाथ शिंदेचलित शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्श करून जरांगे-पाटील यांचे स्वागत केले. यावेळी सर्वपक्षीय मराठा नेते व कार्यकर्ते एकवटले होते. मेळाव्यात बोलताना जरांगे-पाटील यांनी प्रामुख्याने ओबीसी नेते, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केले.
हेही वाचा >>> “महायुतीत मोठ्या भावाने एक पाऊल मागे घेणे ही पूर्वीपासून भाजपाची भूमिका”; चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य चर्चेत
भुजबळ यांना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही मराठा समाजाची मने दुखवायला लागला आहात. मराठा समाजाने तुमच्याकडे कधीही जाती-पातीचा विचार न करता पाहात आलो आहोत. तुमच्यासह अनेक ओबीसी नेत्यांवर आमचा मराठा समाज पिढ्यान् पिढ्या गुलाल टाकत आला आहे. मराठा समाजाने तुमचा द्वेष कधीही केला नाही. परंतु आमची पोरं अडचणीत आली आहेत, तर तुम्ही म्हणता मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ नका. आरक्षण खालचं, वरचं द्या, असे म्हणता. यापुढे भुजबळ यांनी आम्हाला अजिबात डिवचू नये, एकदा मराठा समाज पेटला की त्याचे परिणाम काय होईल, याची जाणीव ठेवा, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.
हेही वाचा >>> “…आता मला जेवण जाणार नाही”, ‘त्या’ प्रश्नावर नारायण राणेंचा संताप
मराठा समाजाला संपूर्ण राज्यात सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे, यात शासनाने पुन्हा चालढकल केल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असाही इशारा त्यांनी दिला. मराठा आरक्षण आंदोलन निर्णायक टप्प्यात आले असताना आता मराठा समाजाने एक इंचही मागे सरकू नये. सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांकडून मराठा समाजातील नेत्यांमध्ये फूट पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात कोणी फुटले आणि सत्ताधा-यांच्या गळाला लागले तर आशा नेत्यांना सांगा, तुम्ही गप्प बसा आणि निदान मराठा पोरांच्या अन्नात माती कालवू नका,असे हात सोडून सांगा, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले.