नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ लढतील अशी चर्चा आहे. तसंच नाशिकमधले विद्यमान खासदार हेमंत गोडसेही या जागेसाठी इच्छुक आहेत. अशात या सगळ्या चर्चांवर छगन भुजबळ यांनीच उत्तर दिलं आहे. तर भाजपानेही या जागेवर दावा सांगितला आहे. अशात नाशिकच्या जागेवर छगन भुजबळ यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
“मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, शिंदे गटाचे गोडसे प्रयत्न करत आहेत ते विद्यमान खासदार आहेत. त्यांनी प्रयत्न केलाच पाहिजे. भाजपाचे १०० नगरसेवक आहेत, आमदार आहेत. त्यांनी प्रयत्न करणं चूक नाही. ज्या कुणाला तिकिट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून करु. संपला विषय” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “नाशिकच्या जागेवरुन वेगळी विधाने करणे अयोग्य”, राधाकृष्ण विखे यांचा भुजबळ यांना टोला
माझ्या नावाची जर घोषणा झाली तर.. वगैरे असले काही प्रश्न येत नाहीत. कारण जर-तरच्या प्रश्नांना उत्तर देत नाही. घोषणा झाली तर तुम्हाला सांगेन असं पत्रकारांना उद्देशून छगन भुजबळ म्हणाले. मी कुठेही गेलो तरीही येवला आणि मी आमचं प्रेम कमी होणार नाही. येवल्यासाठी दिल्लीतून प्रयत्न करणार का? हे विचारल्यावर अरे आधी तिकिट तर मिळू दे मग दिल्ली. सध्या आपण गल्लीतच आहे, गल्लीची चर्चा करु असं भुजबळ म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या एका दौऱ्यावर २५ कोटींचा खर्च होतो याबाबत विचारलं असता भुजबळ म्हणाले, हे बघा निवडणूक आली आहे, कोण काय आरोप करेल त्याचा काही भरवसा नाही. राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या जाण्यायेण्याचा खर्च जास्तच असतो. त्यावर टीका झाली तर कसं काय होईल? असा प्रश्न भुजबळ यांनी विचारला आहे.