मराठा आरक्षणाला मी किंवा माझ्या पक्षाने तसंच समता परिषदेने कधीही विरोध केलेला नाही. पण आम्ही पहिल्यापासून हे निश्चितपणे म्हणालो आहोत की मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये. वेगळं आरक्षण त्यांना द्या, सर्वोच्च न्यायालयात ज्या त्रुटी असतील त्या दूर करा आणि मराठा बांधवाना आरक्षण द्या असं आता छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ओबीसीमध्ये अतिशय लहान लहान जाती आहेत. धनगर, वंजारी, कुणबी, माळी, तेली, सुतार, लोहार, कुंभार असे अनेक लोक त्यात आहे. त्यामुळे ओबीसींमधून आरक्षण दिलं तर कुणाचाच फायदा होणार नाही असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं
मराठा समाजाला आरक्षण देणं आवश्यक आहे. त्यासाठी आयोग नेमला जावा आणि त्यांना आरक्षण दिलं जावं. जी आमची भूमिका आहे ती भूमिका सर्व पक्षीयांची आहे. सर्वपक्षीय बैठक झाली त्यातही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं यावर सगळ्यांचं एकमत झालं आहे. मात्र मला एक समजलं नाही अचानक आंदोलन सुरु करण्यात आलं त्यात प्रचंड नासधूस करण्यात आली. त्यात कुणी सापडलं असतं तर त्यांना ठार मारण्यात आलं असतं.
सुभाष राऊत यांच्या हॉटेलचं मोठं नुकसान
सुभाष राऊत यांचं जे हॉटेल आहे त्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. एक तास तिथे ५०० लोकांचा जमाव होता. मंत्रालयात माझ्यासमोर सुभाष राऊत बसले होते आणि मी पाहिलं की प्रकाश सोळंके यांचं घर कुणीतरी पेटवलं, त्यानंतर मी पोलीस अधीक्षकांना फोन केला. सुभाष राऊत यांच्या हॉटेलला संरक्षण द्या असंही सांगितलं होतं. मात्र अचानक तीन तासांनी ते हॉटेल जाळण्यात आलं. त्यावेळी कुऱ्हाडी, पहारी, विळे सगळं घेऊन आले होते. हॉटेलची राखरांगोळी करण्यात आली. एक तास जाळपोळ सुरु होती. आम्ही कुणाला विरोध केला नव्हता. आम्ही फक्त आमचं आरक्षण अबाधित ठेवा इतकंच सांगितलं होतं असंही भुजबळ म्हणाले.
प्रकाश सोळंकेच्या घरात दगड फेकले गेले, सगळं पूर्वनियोजित
प्रकाश सोळंकेच्या घरात मोठमोठे दगड फेकण्यात आले. तसंच कोयते, विळे हेदेखील फेकले गेले. जयदत्त क्षीरसागर यांचं ऑफिस बेचिराख करण्यात आलं. संदीप क्षीरसागर यांच्या घरीही हाच प्रकार घडला. तिथल्या मुलांना भिंतीवरुन उड्या टाकून बाहेर पडावं लागलं. आगीत ती मुलं सापडली असती तर ती मुलं मेली असती. नासधूस करण्यासाठी सांकेतिक क्रमांक दिले गेले होते. जी काही जाळपोळ झाली ती पूर्वनियोजित कट रचून झाली असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.
प्रकाश सोळंके काय म्हणाले होते? आरक्षणाने सगळे प्रश्न सुटत नाहीत. ते काहीही चुकीचं बोलले नव्हते. तरीही त्यांचं घर जाळण्यात आलं. त्यांनी विरोधही दर्शवला नव्हता तरीही घर जाळण्यात आलं. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. पोलीस हतबल का झाले होते? पोलिसांनी प्रतिकार केला नाही असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.