मराठा आरक्षणावरून राज्यातील प्रश्न जटील बनत चालला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं असल्याने छगन भुजबळांनी नकार दिलाय. मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला विरोध नसून ओबीसीतून त्यांना आरक्षण देण्यास विरोध केला आहे. गेल्या काही दिवसांत मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ यांच्यातील द्वंद्व अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर केलेले आरोप आज त्यांनी सभागृहासमोर मांडले. तसाच, एक गंभीर आरोप केला आहे.
छगन भुजबळ यांनी आज मराठा आरक्षणप्रश्नी राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर सभागृहात भाष्य केलं. जवळपास पाऊणतास त्यांनी आज सभागृहात त्यांचं मत मांडलं. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंवर टीकाही केली. तसंच, त्यांनी काही वृत्तांची कात्रणे सभागृहासमोर ठेवले. यात “आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो”, “जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल, मी त्याचा कार्यक्रमच करतो”, “आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, भुजबळांनाही पाहून घेऊ”, ही मनोज जरांगे पाटलांची वृत्तपत्रात छापून आलेली वक्तव्ये त्यांनी सभागृहात वाचून दाखवले.
“२४ डिसेंबला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी, भुजबळ फॉर्म… ज्यांना कोणाला पाहायचं आहे, त्यांनी नावे कळवावी”, हे पत्रकही त्यांनी वाचून दाखवलं. ते म्हणाले की, याचा अर्थ माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झाली. प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागरचं झालं, आता माझ्यावरही हल्ला होणार.
“सकाळी उठलो आणि पाहिलं की सुरक्षा वाढवली आहे. सुरक्षा का वाढवली याची चौकशी केली तेव्हा पोलीस म्हणाले की वरून इनपूट आलेलं आहे की भुजबळांना गोळी मारली जाईल. पोलिसांचा अहवाल आहे”, असा दावाही त्यांनी केला.
“हरकत नाही. मी मरायला तयार आहे. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. त्यांना वेगळं आरक्षण द्या. आज छगन भुजबळ आहे, प्रकाश सोळंके झाला. उद्या मी असेन. आपण त्यावर गप्प बसणार का? कोणी त्याचा निषेध करणार नाही? कोणी बघायला जाणार नाही? आज महाराष्ट्रसमोर हाच माझा प्रश्न आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.